|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खासदारांच्या नुकसान पाहणी दौऱयात भक्तांच्या पायघडय़ा

खासदारांच्या नुकसान पाहणी दौऱयात भक्तांच्या पायघडय़ा 

प्रतिनिधी / सोलापूर :

मठाधीश खासदार झाले. यामुळे राजकारणात भक्ती आणि निष्ठा निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. खासदारकीच्या पट्टाभिषेकामुळे मठाला वैभव प्राप्त झाले. पण समाजाच्या विकासाचे काटे उलटेच फिरु लागले. आसवे पुसण्याचे नाटक अन् ढोंगच सुरु झाले. याचे प्रत्यक्ष दर्शन उत्तर सोलापूर येथील शेतीच्या नुकसानीच्या पाहणीवेळी घडले. खासदार महास्वामींच्या पायाला चिखल लागू नये, म्हणून भक्तवत्सल कार्यकर्त्यांनी चक्क दगडांच्या पायघडय़ा घातल्या. महास्वामींनीही नेहमीप्रमाणे स्मित हास्य करीत, एक डोळा मिचकावत मनोमन स्वीकारले. याचे उलट पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.

परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला. थांबायचं नावच घेत नसल्याने दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या सोलापूर जिह्यात ओल्या दुष्काळाची आणाबाणी जाहीर करण्याची वेळ आली. दोन दिवस झाले, थोडय़ा प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला. शिवार वापसा येण्याच्या प्रतिक्षेत असताना आणि शेतकरी दु:ख विसरुन पेरणीची जुळवा जुळव करीत असताना खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी थेट उत्तर सोलापूर तालुका गाठला. सर्वाधिक नुकसान मोहोळ तालुक्यात झाले आहे. याचा आकडा 10 हजार 238 हेक्टरवर आहे. त्यानंतर उत्तर तालुक्याचा नंबर लागतो. तरीही उत्तर तालुक्यात अधिक भक्त आणि जवळचे भक्तवत्सल कार्यकर्ते असल्याने महाराजांची स्वारी थेट उत्तर तालुक्याच्या बांधावर पाहोचली. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हजर होतेच. महाराजांच्या तळपायाला चिखल, माती, काटे, दगड, धोंडे लागू नये, म्हणून चक्क फरशीच्या आकाराचे दगड टाकून भक्तवत्सल कार्यकर्त्यांनी जणू पायघडय़ाच घातल्या. याचे महास्वामींनी मनोमन स्वागतच केले. कार्यकर्त्यांच्या या धडपडीच्या वेळी त्यांची भावमुद्राही प्रसन्न वाटत होती. मात्र बिचाऱया शेतकऱयांना त्यांची पिके अति पावसाने कुजून गेल्याने काय दु:ख होत असेल, याचे भान त्यांच्या मनीही नसल्याचे यावेळी जाणवल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.

Related posts: