|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शरद पवारांनी घेतली निकमांकडून जिल्हय़ातील नुकसानीची माहिती

शरद पवारांनी घेतली निकमांकडून जिल्हय़ातील नुकसानीची माहिती 

प्रतिनिधी / कराड :

कराड येथे यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यगौरव कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी जिल्हय़ात पावसाने झालेल्या नुकसानीबाबत व मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल माहिती घेतली.

  यावेळी निकम यांनी यावर्षी अतिवृष्टी तसेच अवकाळी पडलेल्या पावसाने भातशेती, सुपारी, नारळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंबा, काजू  यांच्या मोहरावरही परिणाम होणार आहे. यातच सरकारने जाहीर केलेली प्रतिगुंठा 68 रूपये ही नुकसान भरपाई अत्यल्प असून शेतकऱयांची चेष्टा चालवणारी आहे. त्यामुळे शेतकऱयांना अधिकाअधिक नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याने आपण यासंदर्भात लक्ष द्यावे, अशी विनंती पवार यांना निकम यांनी केली.

  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम आणि पडलेल्या खड्डय़ांमुळे वाढलेले अपघात याची माहितीही निकम यांनी दिली. चिपळूण शहरात सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले. नुकसान भरपाईबाबत केंद्रीय कृषीमंत्री तसेच महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी साताऱयाचे खासदार श्रीनिवास पाटील व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

 

 

 

Related posts: