|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तेतून बाहेर फेकल्यानेच गोवा फॉरवर्डला म्हादईचा पुळका

सत्तेतून बाहेर फेकल्यानेच गोवा फॉरवर्डला म्हादईचा पुळका 

प्रतिनिधी /म्हापसा :

गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आज सरकारवर म्हादईप्रश्नी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करीत आहेत. गेल्यावेळी सरकार घडले तेव्हा जलसिंचन खाते गोवा फॉरवर्डकडेच होते, त्यावेळी त्यांना म्हादईचा पुळका आला नाही काय? त्यांना सरकारातून काढून टाकल्यामुळे सूड घेण्यासाठीच आज ते सरकारवर टीका करीत आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल करू पाहत असून गोव्याची जनता त्यांना पूर्णतः ओळखत आहे, अशी टीका कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी येथे काल गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

कळसा-भंडुराचे पाणी वळविताना हे गप्प का?

2017 मध्ये सरकार आले त्यावेळी जलसंचलन खाते गोवा फॉरवर्डकडे देताना माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांनी या खात्यात म्हादई ही गंभीर समस्या असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी कर्नाटक सरकारने बेकायदेशीररित्या कळसा-भंडुराचे बांधकाम करून पाणी वळविण्यास सुरवात केली, तेव्हा राज्यात भाजपचे, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार होते. 2017 ते 2019 दरम्यान गोवा फॉरवडचे जलस्रोतमंत्री असताना त्यावेळी काहीच केले नाही. आज फॉरवर्ड राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेऊन सरकार विरोधात तक्रार नोंद करते, ही दिशाभूल आहे.

गोवा फॉरवर्डला म्हादईचे काहीच पडलेले नाही

म्हादई नदीचे पाणी कर्नाटक सरकारने वळविले होते तेव्हा आम्ही एक अभ्यास दौरा केला होता, त्यात सहा आमदार होते. अनेक पत्रकारही गेले होते. आपण त्यावेळी उपसभापती होतो व डॉ. सावंत सभापती होते. त्यावेळी गोवा फॉरवर्ड आणि खासकरून त्यावेळचे जलसिंचनमंत्री आमचे प्रतिनिधीत्व करणार होते मात्र ते आले नव्हते, कारण त्यांना राज्याचे काहीच पडलेले नाही. आता राजकीय श्रेय घेण्यासाठीच त्यांचा आटापिटा चालला असून त्यात त्यांचे काहीच साध्य होणार नाही असे मंत्री लोबो पुढे म्हणाले.

दिशाभूल करणाऱया गोवा फॉरवर्डचा निषेध

आज गोवा फॉरवर्ड तथ्यहीन प्रश्न उपस्थित करत आहे. केवळ एका पत्रामुळे सरकारला बदनाम करत आहे. आम्ही या वृत्तीचा निषेध करीत आहोत असे मंत्री लोबो म्हणाले. या म्हादईप्रश्नी विधानसभेत सर्वात जास्त आणि योग्य कोण बोलले तर ते डॉ. प्रमोद सावंत आहेत. म्हादई प्रश्न सरकारने गंभीर्याने घेतला आहे. याप्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे. काही प्रकरणे राज्य सरकार  न्यायालयात जिंकलेही आहे. सरदेसाई यांनी नाहक लोकांची दिशाभूल करू नये, असे मंत्री म्हणाले.

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, माजी मंत्री निर्मला सावंत व आताचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नी सदैव आवाज उठविला आहे. गोवा फॉरवर्डवाले म्हादई प्रश्नी सरवायवल व रिवायव्हल होऊ पाहत आहेत पण त्यांना ते शक्य नसल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. हे अटल सेतूवरून पाण्यात बुडलेले आहे ते वर येऊ पाहत आहे पण जनता त्यांना वर काढणार नाही असे ते म्हणाले.

Related posts: