|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कर्तारपूरचे कारस्थान

कर्तारपूरचे कारस्थान 

शीख भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन शुक्रवारी पाकिस्तानात, तर शनिवारी भारतात होणार आहे. पाकिस्तानातील या गावी शीखांचे प्रथम धर्मगुरू गुरू नानकदेव यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. तेथे गुरूद्वाराही आहे. त्यामुळे हे स्थान भारतातील, तसेच जगभरातील शीख लोकांसाठी अतिशय पवित्र आहे. भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर येथे दर्शनासाठी जाता यावे व त्यासाठी मार्गाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ होत आहे. ती आता पूर्ण झाली असून पंजाब राज्यातून कर्तारपूर येथे जाण्यासाठी 18 किलोमीटर लांबीची मार्गिका भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या त्यांच्या भागात तयार केली आहे. शीख भाविकांची मागणी अशा प्रकारे मार्गी लागली असली, तरी पाकिस्तानने नेहमीच्या सवयीनुसार त्याचे ‘खायचे दात’ दाखविण्यास प्रारंभ केला आहे. पाकच्या कारस्थानी आणि भारतद्वेषी धोरणाचा प्रत्यय भारताला येणार याचे अनुमान आधी करण्यात आले होतेच. त्याचप्रमाणे होत आहे. मार्गिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कर्तारपूर येथे जी भित्तीपत्रके लावण्यात आली, त्यावर खलिस्तानी हिंसाचाराचा दिवंगत म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले तसेच अन्य शीख दहशतवाद्यांची छायाचित्रे ठळकपणे होती. पाकिस्तानच्या मनात नेमके काय शिजत आहे, हे या घटनेवरून उघड झाले. ही मार्गिका भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा परस्पर संपर्क यावा आणि त्यातून दोन्ही देशांच्या शांततामय सहजीवनाला चालना मिळावी, अशा उदात्त हेतूने तयार करण्यात आली असली तरी ही उदात्तता केवळ शाब्दिकच असेल हे पाकने दाखवून दिले. या मार्गिकेचा उपयोग पंजाबमध्ये पुन्हा फुटीरवाद, दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्यासाठी केला जाऊ शकतो, हे पाकच्या या वरवर लहान वाटणाऱया कृतीमुळे दिसून आले. या मार्गिकेचा उपयोग करून भारतातून प्रतिदिन पाकिस्तानात 5 हजार यात्रेकरूंना जाण्याची अनुमती मिळणार आहे. या यात्रेकरूंमध्ये प्रामुख्याने शीख भाविकच असणार हे उघड आहे. या भाविकांच्या मनात भारताविरोधी भावनेची लागण व्हावी आणि पंबाजमध्ये पुन्हा खलिस्तानी हिंसाचाराचा भडका उडावा, अशी पाकची इच्छा आहे. त्यामुळे हे भाविक एवढय़ा मोठय़ा संख्येने पाकिस्तानात पोहचल्यावर त्यांच्या मनात फुटीरतेची भावना निर्माण व्हावी, याचा पुरेपूर प्रयत्न पाककडून होणार हे निश्चित आहे. त्यासाठीच आता पाक भिंद्रनवालेसारख्या दहशतवाद्यांचा आधार घेत आहे. कर्तारपूर मार्गिकेमुळे या प्रयत्नांना खतपाणी मिळू शकते. पंजाब भारतापासून तोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानने 70 च्या दशकापासून चालविले आहेत. 80 आणि 90 च्या दशकांमध्ये पाकपुरस्कृत फुटीरतावाद व दहशतवाद पंजाबमध्ये उफाळला होता. शेकडो लोकांचे त्यात बळी गेले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळीही शीख दहशतवादानेच घेतला. मात्र महत्प्रयासाने हा हिंसाचार आणि फुटीरतेची भावना रोखण्यात भारताला यश आले. आता त्याच काळय़ा कालखंडाची पुनरावृत्ती करण्यास पाकिस्तान मागेपुढे पाहणार नाही. वास्तविक पाकिस्तानला शीख समुदायासंबंधी कोणतीही आपुलकी नाही. पाकिस्तानाचे नागरिक असणाऱया शीखांचे जीवन तेथे सुरक्षित नाही. त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव नेहमी टाकला जातो. हिंदू मुलींप्रमाणे शीख मुलींचेही अपहरण केले जाते. त्यांचे सक्तीने धर्मांतर करून त्यांचा निकाह मुस्लीम माणसांशी लावला जातो. गेल्या दोन महिन्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. शीखांची पाकिस्तानातील लोकसंख्याही झपाटय़ाने कमी होताना दिसते. स्वतःच्या देशात शीख समुदायाला अशी अमानुष वागणूक देणारा पाकिस्तान भारतातील शीख समुदायासंबंधी मात्र भलताच पुळका दाखवितो. हे कारस्थान भारत आणि भारतातील शीख समुदाय या दोघांनीही समजून घेणे आवश्यक आहे. भारतातील शीख समाज हा शांतताप्रिय, भारतनिष्ठ, कष्टाळू आणि राष्ट्रवादी आहे हे निःसंशय. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि संरक्षण क्षेत्रात पूर्वापारपासून शीख समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. असा समाज पाकिस्तानच्या डावपेचांना बळी पडणार नाही, असे विश्वासपूर्वक म्हणता येते. तथापि, या समाजातील काही मोजक्या अपवादांना हाताशी धरून पाकिस्तान भारतात गोंधळ आणि रक्तपात घडविण्याचा प्रयत्न करणार ही काळय़ा दगडावरची पांढरी रेघ आहे. हिंसाचारी माणसांची संख्या अल्प असली तरी ती त्यांच्या कृत्यांच्या माध्यमातून समाजाच्या मनात भीती निर्माण करत असतात. भीती निर्माण करणे हे एक दबावतंत्र असते. दहशतवादी हे दबावतंत्र उपयोगात आणतात असे प्रत्येक वेळी दिसून येते. त्यामुळे भारताने अतिशय सावध असणे आणि सुरक्षेच्या मुद्दय़ांवर सदैव सजग असणे ही अनिवार्यता आहे. कर्तारपूरला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या शीखांना पाकिस्तान कोणता संदेश देतो, तसेच त्या संदेशाचा परिणाम या समुदायाच्या मानसिकतेवर काय होतो, याकडे आता भारताला लक्ष ठेवावे लागणार.  पाकचे डावपेच उधळायचे असतील तर कर्तारपूर मार्गिकेचा उपयोग त्याला अशा प्रकारे करू न देण्यासाठी भारतातला आता कसून प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. तसेच प्रबोधनाच्या माध्यमातूनही पाकचे डावपेच आणि कटकारस्थाने चव्हाटय़ावर आणावी लागणार आहेत. भावनेपेक्षा देशहितालाच प्राधान्य देऊन कठोर निर्णय करण्याची वेळ भविष्यात आली तर तसेही करण्याची तयारी असावयास हवी. काही जाणकारांच्या मते भारताने मोठा धोका पत्करला असून आता सावधपणा हाच उपाय हाती उरला आहे. संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्जता आतापासूनच ठेवावयास हवी. त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते अंगलट येण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related posts: