|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नाटक आयुष्यातील अविभाज्य घटक :  श्रीनिवास भणगे

नाटक आयुष्यातील अविभाज्य घटक :  श्रीनिवास भणगे 

पुणे /  प्रतिनिधी : 

नाटक हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. लेखकाला तर प्रत्येक गोष्टीत नाटय़ शोधता आले पाहिजे. मराठी भाषेत जर नाटय़लेखन होणार असेल तर मराठी संस्कृतीचा, काळाचा आणि परंपरेचा अभ्यास व्हायला हवा. दृष्टिकोन मिळत असल्याने वास्तववादी नाटक व्हायलाच हवे, असे आग्रही मत मांडताना नाटककाराला आविष्कार स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका विख्यात नाटककार, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्रीनिवास भणगे यांनी शुक्रवारी मांडली.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भरत नाटय़ संशोधन मंदिर आणि संवाद पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या संगीत नाटय़ संमेलनाअंतर्गत पहिल्या मराठी नाटय़-तंत्रज्ञ संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनानिमित्त आयोजित ‘नाटय़लेखन’ या विषयावर ते बोलत होते.

कुठलीही कलाकृती वेडातून निर्माण होते, असे सांगून भणगे म्हणाले, लेखकाने प्रत्येक क्षणी नाटक जगणे महत्त्वाचे असते. जीवनाच्या प्रत्येक क्षणात नाट्य दिसायला लागले की नाटकाचा, लेखनाचा कीडा चावला असे म्हटले जाते. जगण्यातलं नाटय़ शोधून ते मांडता आले पाहिजे. ज्यात दोन टक्के प्रतिभा, तर 98 टक्के निरीक्षण आहे. नाटय़ लेखन करताना लेखकाने नाटकाच्या संपूर्ण प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे. लेखकाने वाचन करणेही तितकेच गरजेचे आहे.

प्रेक्षकांची मानसिकता अजूही 1930 मधील

नाटक हे प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य अंग आहे. प्रेक्षकाने विचारी होणे आवश्यक आहे. मात्र प्रेक्षकांची मानसिकता अजूनही 1930 मधीलच आहे. अभिनय सोडून काहीही पहा, अशी सवय सध्या प्रेक्षकांना लागली आहे. प्रेक्षकवर्ग प्रगल्भ होण्यासाठी नाटककारांनी प्रेक्षकांना वैचारिक खाद्य पुरविले पाहिजे. यासाठी प्रेक्षकांच्या कार्यशाळाही घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा भणगे यांनी व्यक्त केली.

 

Related posts: