|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » सत्ता स्थापा. अन्यथा, सर्वांना सर्व पर्याय खुले : उद्धव ठाकरे

सत्ता स्थापा. अन्यथा, सर्वांना सर्व पर्याय खुले : उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / मुंबई :  

भाजपाने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. अन्यथा, सर्वांना सर्व पर्याय खुले आहेत, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपाला दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे यांनी भाजपा व फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, होय, मला खोटे ठरविणाऱयांशी बोलायचे नव्हतेच. बोलायला मला वेळ नव्हता, असे नाही. पण मी मुद्दाम त्यांच्याशी बोललो नाही. खोटे बोलणाऱयांबरोबर मी बोलत नाही. कारण ती आमच्या घराण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांनी मला खोटे ठरवले. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. त्यामुळे मी हे सहन करू शकत नाही. आमच्यात काय ठरले होते, त्याचे आपणही साक्षीदार आहात. चर्चेच्या वेळी ते म्हणाले, आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देतो, पण मी त्यांना सांगितले, मी माझ्या वडिलांना वचन दिले होते, की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देईन. मला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि समान वाटप पाहिजे. मात्र निवडणुकीनंतर सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडी करते, हे मी पाहिले. देवेंद्र फडणवीस हे आजही मित्र आहे. मात्र, यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरे आहे. 50-50 चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, हे देवेंद्र फडणवीस म्हणाले हे साफ खोटे आहे. संघाला असा खोटारडेपणा चालतो का, याचे उत्तर त्यांनीही द्यावे.

आपण मोदींवर कधीही टीका केली नाही. उलट अनेक टीका करणाऱयग्नांशी भाजपाने घरोबा केला आहे. अनेक राज्यांत भाजपाने तत्त्वांना तिलांजली देऊन सत्ता स्थापन केली. आता त्यांनी आम्हाला शिकवू नये. ते सत्तेसाठी खेळय़ा खेळत असतील, तर आम्ही काही पाऊल उचलले, तर आम्ही गुन्हेगार कसे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. राम मंदिराचा निर्णय हा न्यायालयाचा असेल. त्याचे श्रेय भाजपाला घेत येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजपाला आपण शत्रू मानत नाही. त्यांनी सत्ता स्थापन करावी. अन्यथा, सर्वांसाठी सर्व पर्याय खुले असतील. युती ठेवायची वा नाही, हे आता भाजपानेच ठरवावे, असे सांगत आमदारांना कुठे ठेवायचे, हा आपला अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: