|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संवाद » कोलंबी बिर्याणी

कोलंबी बिर्याणी 

साहित्य:

15-20 मध्यम आकाराच्या कोलंबी (झिंगे), 2 बटाटे चकत्या करून 

भातासाठी-2 वाटय़ा बासमती तांदूळ, 4 वाटय़ा पाणी, सगळा खडा मसाला (3-4 लवंग, 2 वेलदोडे, 3-4 मिरी , तमालपत्र, 1इंच दालचिनी)

ग्रेवीसाठी -दीड वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट (समप्रमाणात), 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, दीड टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद  , बिर्याणीसाठी मसाला-  1 टीस्पून जिरे, 1इंच दालचिनी , अर्धा  टीस्पून शहाजिरे,  3-4 मिरी, 2 वेलची,  2  चिमूट जायफळ पावडर, पाव टीस्पून जायपत्रीची पावडर,3  लवंगा, अर्धा चमचा लाल तिखट, 1 तमालपत्र, 1 टीस्पून धने,अर्धा चमचा कसुरी मेथी,1 मसाला वेलची – हा सगळा मसाला कच्चा भाजून घ्या आणि मिक्सरवर वाटून त्याची बारीक पूड करा.(दीड ते 2 टीस्पून रेडीमेड बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल.)

तळण्यासाठी- 1वाटी उभा चिरलेला कांदा,
 8- 10 काजू, 10-12 बेदाणे, तेल, मीठ चवीप्रमाणे

कृती :

सर्व प्रथम तांदूळ 10 मिनिटे आधी धुवून ठेवा. पातेल्यात 3 टेबलस्पून तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि 2-3 मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले की, तांदळाच्या दुप्पट (तीन वाटय़ा) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा, वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.

भात पूर्ण शिजला की झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे. फक्त चमच्याने भात वर खाली करा म्हणजे भाताचे शीत मोडणार नाही. आणि भात छान मोकळा होईल.

बटाटय़ाची साले काढून त्याच्या चकत्या करा. त्याला मीठ, थोडी हळद आणि थोडे तिखट लावून ठेवा.एकीकडे कढईत पुरेसे तेल गरम करा. तेलात काजू आणि बेदाणे टाळून घ्या. काजू-बेदाणे लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.

नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर ग्रेवीसाठी त्यातच ठेवून द्या. कढईत उरलेले तळणीचे तेल गरम करा.त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. छान वास आला की कांदा घालून 2-3 मिनिटे परता. टोमॅटो, लाल तिखट ,हळद,  बिर्याणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. मग कोलंबी घालून परता. मीठ घालून ढवळा 1 कप पाणी घालून झाकण ठेवा. 5-10 मिनिटे कोलंबी शिजू द्या.

ग्रेवी तयार झाली की, वेगळय़ा पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या.

नंतर पातेल्यात सर्वात खाली बटाटय़ाच्या चकत्या लावा. त्याच्या वर भाताचा थोडा जाड थर करा. त्यावर तळलेला कांदा, काजू, बेदाणे घाला. वर थोडी ग्रेवी घाला. मग परत भाताचा थर. वरती कांदा, काजू बेदाणे, वरती ग्रेवीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काजू बेदाणे, कोथिंबीर घालून सजवा.  पातेले 15 मिनिटे बारीक गॅसवर ठेवा. वरून झाकण ठेवा. वाफेने तळाचे बटाटे शिजतील. मग बिर्याणी तुम्ही सर्व्ह करू शकता.

 

Related posts: