|Friday, February 21, 2020
You are here: Home » संवाद » गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगावची अंतिम फेरी

गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगावची अंतिम फेरी 

का हिंदी चित्रपटसृष्टीला मायानगरी असं म्हटलं जातं. इथे नृत्य, नाटय़, शिल्प, संगीत या कलांचा आविष्कार साकारतो. इथे असंख्य कथा आणि दंतकथांचा इतिहास साकाळलेला आहे. हिंदी चित्रपटातील गाणी हा एक वेगळाच विषय आहे. विशेषत: हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे 1945 ते 1965-70. या काळातील चित्रपटगीते ही भारतीय संस्कृतीचे एक अंग बनून गेली आहेत. रचना, चाली, संगीत, गायकी आणि सादरीकरण किंवा चित्रीकरण या सर्वच दृष्टीने ही गाणी अजरामर ठरलेली आहेत. त्यामुळेच या गाण्यावर आजचे काही कलाकार ‘रिमिक्स’ गाणी करून ‘पॅरासाईटचे’ जीणे जगत आहेत.

गतकाळातील सर्वच कलाकारांनी अपरिमित कष्ट सोसून ही सुवर्णलेणी उभी केली आहेत. मागास तंत्रज्ञानावर मात करून प्रतिभेचा अद्भूत साक्षात्कारच या मंडळींनी घडविला आहे. रॅमिंग्टन टाईपरायटर कंपनीचा सेल्समन स्व. कुंदनलाल सैगल हा अपघाताने सापडलेला पहिला कोहिनूर हिरा होय! कम्युनिस्ट चळवळीशी निगडीत कोलकात्यातून पोलीसांचा ससेमिरा चुकवत मुंबईत पोहोचलेले अनिल विश्वास संगीत विश्वातले पितामहपद प्राप्त करून गेले. नट बनण्याचे स्वप्न घेऊन आलेले मुकेश, सी. रामचंद्र, तलत मेहमूद यांनी वेगळा इतिहास रचला. मिलिटरीमधून आलेले खैय्याम आणि मदन मोहन हे सुमधुर गीतांची रास ओतून गेले. सचिनदेव बर्मन, राजघराण्यातील विलासी जीवनावर लाथ मारून सर्व धनदौलत जमीनजुमल्यावर पाणी सोडून संगीतकार बनले आणि सम्राटपदही मिळवलं. ‘गाणे विकणार नाही’ म्हणणारा कवि कुलभूषण शैलेंद्र, रेल्वेमध्ये वेल्डिंग विभागात काम करत होता, हे अद्भूत नव्हे काय? अशा कहाण्या त्या काळातील सर्वच गीतकार, संगीतकार, गायक-गायिका यांच्याबद्दल ऐकावयास मिळतील.

हा गाण्यांचा वारसा मधल्या काळात लोपला होता. पाश्चात्य संगीताचा विकृत प्रभाव घेऊन आजही जी गाणी बनविली जातात, ती जन्मताक्षणीच मृत होतात. पण ‘तू गंगाकी मौज, मै जमुना की धारा किंवा ए दिल है मुश्कील, जीना यहाँ किंवा तुम न जाने किस जहाँमे खो गये’ ही गाणी रसिक विसरू शकतील का? अशक्मयच… कारण ही गाणी रसिकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आहेत. अशी ही गाणी नव्या पिढीला ठाऊक असणे शक्मय नाही, यात त्यांचा दोषदेखील नाही.

नव्या पिढीला हा सुवर्णकाळ समजावा, कलाकारांना, ही गाणी, त्यांची गोडी आजमावता यावी, म्हणून लोकमान्य सांस्कृतिक विभाग संचलित रसिक रंजन- बेळगाव या संस्थेने गेल्या दोन वर्षापासून ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची सिनेगीत गायन स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या आहेत. यंदाचं हे तिसरं वर्ष असून, रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी चार वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे ही महाअंतिम फेरीची लढत रंगणार आहे. या फेरीसाठी प्रत्येकी तीन कलाकार असलेले चार संघ अटीतटीने दाखल झाले आहेत. भैरव, आसावरी, दरबारी आणि ललत हे ते चार संघ असून प्रत्येक संघास एकूण आठ गाणी सादर करावयाची आहेत.

प्रथम येणाऱया संघास 25,000रू.चे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येईल, द्वितीय संघास 20,000/- रूपये, तृतीय संघास 15,000/- रूपये आणि चौथ्या संघास उत्तेजनार्थ 10,000/- रूपये शिवाय स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रही देऊन गौरविण्यात येईल. अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांच्या प्राचार्यांचाही गौरव करण्यात येईल.

प्रमुख पाहुणे विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार डॉ. ए. एस. देशपांडे आणि के. एल. ई स्कूल ऑफ म्युझिकचे (केहेर) डायरेक्टर डॉ. राजेश भांडणकर हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा ठीक 4 वाजता सुरू होईल. स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ होईल. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामुल्य प्रवेश असून, काही जागा राखीव आहेत. रसिकांनी नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहावे.

Related posts: