|Saturday, February 22, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » पुण्यात ‘वंदे मातरम्’ चे विशेष प्रदर्शन

पुण्यात ‘वंदे मातरम्’ चे विशेष प्रदर्शन 

पुणे /  प्रतिनिधी : 

मराठी सिनेरसिकांच्या मनावर भुरळ घातलेल्या ‘वंदे मातरम्?’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन अनुभवण्याची संधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने मिळणार आहे.  उद्या (शनिवारी) सायंकाळी 5 वाजता संस्थेच्या सभागृहात हा चित्रपट रसिकांना पाहता येणार आहे.

पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘पुलं’ना अनोखी मानवंदना देण्यासाठी संग्रहालयाकडून पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वंदे मातरम’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे सुनीताबाई आणि पुलंच्या मुख्य भूमिकेबरोबरच पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके या तीन दिग्गजांनी प्रथमच एकत्रितपणे चित्रपटासाठी काम केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि फारशा माहिती नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीवर आधारित असा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राम गबाले यांनी केले होते, तर सुधीर फडके यांनी गायलेल्या ‘वेद मंत्रांहून आम्हां वंद्य वंदे मातरम्?’ या गीताने सिनेरसिकांच्या मनावर भूरळ घातली होती.

पुलंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त मराठी सिनेसृष्टीतील अजरामर कलाकृती असलेल्या हा चित्रपट पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहे, रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्रहालय प्रशासनाने केले आहे.

 पुलंचे हार्मोनियमवादन ऐकण्याची संधी

 लेखन आणि अभिनयाबरोबरच पुलंना हार्मोनियम वादनाचीही आवड होती. त्यांच्या वादनाची एक दुर्मिळ चित्रफित चित्रपट संग्रहालयाकडे होती. मात्र, अनेक दिवस ही चित्रफित हरवलेली आहे, असा समज झाला होता. मात्र, नुकतीच ही चित्रफित पुन्हा सापडली असून, पुलंचे सांगीतिक पैलू उलगडणारी चित्रफितही पुलप्रेमींना पाहता येणार आहे.

Related posts: