|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संतप्त ग्रामस्थांकडून अधिकारी धारेवर

संतप्त ग्रामस्थांकडून अधिकारी धारेवर 

तुळसुली-मांडकुली-पिंगुळी रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आक्षेप

गटार खोदाई, कारपेट डांबरीकरणाची ग्रामस्थांची मागणी

आमदार वैभव नाईक यांनीही सुनावले खडे बोल

प्रतिनिधी / कुडाळ:

तुळसुली-मांडकुली-पिंगुळी या दरम्यानच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेल्या तीन किमीच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱयांना धारेवर धरले.

संपूर्ण रस्त्यावर गटार खोदावेत तसेच कारपेट डांबरीकरण करावे, अशी मागणी मांडकुली व तुळसुली ग्रामस्थांनी केली. आमदार वैभव नाईक यांनीही अधिकाऱयांना खडे बोल सुनावले. 28 मे रोजी डांबरीकरण करून जूनमध्ये रस्त्यावर खड्डे पडले. गटार खोदलेले नसताना जुलैमध्ये ठेकेदाराचे बिल कसे अदा केले, असा सवाल करत पाच वर्षे रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे, याची आठवण नाईक यांनी अधिकाऱयांना करून दिली. ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर अधिकाऱयांनी डिसेंबरअखेर पूर्वी गटार खोदणे व कारपेट डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

1 कोटी 62 लाखाचे काम

घावनळे-मांडकुली-पिंगुळी या मुख्य रस्त्याचे काम दोन टप्प्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील कर्ली नदीच्या दोन्ही बाजूंचे पिंगुळी व मांडकुली दरम्यानचे काम पहिल्या वर्षी झाले. यावर्षी तुळसुली ते मांडकुली या दरम्यानच्या तीन किमी रस्त्याचे काम घेण्यात आले. त्यासाठी 1 कोटी 62 लाख रुपये मंजूर झाले.

आमदारांचे वेधले होते लक्ष

काम सुरू झाल्यापासून कामाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. संबंधित अधिकाऱयांना सांगूनही त्यात सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांनी काम अडविले होते. कारपेट करण्यापूर्वी गटार खोदणे आवश्यक असताना मे 2019 च्या अखेरीस 28 मे रोजी कारपेट डांबरीकरणाचे काम हाती घेतले असता, दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी काम रोखले होते. त्याबाबत संबंधित विभागाला पत्रही देण्यात आले होते, असे आज अधिकाऱयांसमोर ग्रामस्थांनी आमदार नाईक यांना सांगून ठेकेदार व अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप केला.

कारपेट करण्याचे ठेकेदाराकडून मान्य

मांडकुली येथे जाऊन नाईक यांनी पाहणी केली. माळगावकर व कोचरेकर हे अधिकारी उपस्थित होते. तसेच ठेकेदार प्रतिनिधीही उपस्थित होते. मांडकुली सरपंच तुषार सामंत, उपसरपंच दिलीप निचम, शिवसेना उपशाखाप्रमुख नीलेश सामंत, तातू मुळीक, बाबा वारंग, विजय वारंग, सिद्धेश धुरी, धनवंत खवणेकर व ग्रामस्थांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. प्रश्नांची सरबत्ती केली. डिसेंबर अखेरपर्यंत गटार खोदणे व कारपेट करण्याचे अधिकारी व ठेकेदाराने मान्य केले.

Related posts: