|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » निश्चलनीकरणाला तीन वर्षे पूर्ण

निश्चलनीकरणाला तीन वर्षे पूर्ण 

विरोधकांची सरकारवर टीका, अर्थव्यवस्था धोक्मयात आल्याचा आरोप, सरकारकडून मात्र निर्णयाचे पूर्ण समर्थन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी यांनी 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी रात्री आठ वाजता मोदींनी ही घोषणा केली होती. त्यामुळे साधारणतः चौदा लाख कोटी रुपये किमतीचे चलन रद्द ठरले होते. जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

काळय़ा पैशाची निर्मिती रोखणे, बेहिशेबी पैसा मुख्य प्रवाहात आणणे, लोकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याची सवय लावणे इत्यादी उद्दिष्टांसाठी निश्चलनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्याचाही उद्देश होता.

सरकारचा हा प्रयोग फसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली. तसेच गोरगरीबांच्या हाती पैसा राहिला नाही. परिणामी अर्थव्यवस्था कोसळली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ममता बॅनर्जींनीही मोदी सरकारला याबाबत दोषी धरले असून सरकारच्या आततायी निर्णयामुळे देशाचे नुकसान झाल्याचे वक्तव्य केले आहे.

सरकारकडून समर्थन

सरकारच्यावतीने मात्र या निर्णयाचे समर्थन करण्यात आले असून निर्णयाच्या उद्देशांबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयाचा दीर्घकालीन लाभ होणार असून अर्थव्यवस्थेच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा होता, असेही स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे कार्डमनी आणि डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 60 टक्के वाढ झाली असून भविष्यासाठी हा सुपरिणाम नाकारता येणार नाही, असे म्हणणे सरकारने मांडले आहे.

हा तर दहशतवादी हल्ला

तीन वर्षापूर्वी सरकारने घोषित केलेली नोटबंदी हा जनतेवर दहशतवादी हल्ला होता, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या निर्णयाचा जनतेला प्रचंड त्रास भोगावा लागला. अनेक लोकांचे बँकांसमोरील रांगेत मृत्यू झाले. तसेच अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले, असे आरोप गांधींनी केले. हा अयोग्य निर्णय घेणाऱयांना शिक्षा व्हावयास हवी, असे वक्तव्य काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  

Related posts: