|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱयाला भरपाई हवी

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱयाला भरपाई हवी 

कणकवली पं. स. मासिक सभेत सदस्यांची सूचना

कणकवली:

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. परिणामी अनेक ठिकाणी पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र, पंचनामे पाठविण्याची मुदत काय आहे, उशिरा पंचनामे पाठविल्यास भरपाई मिळाली नाही तर? असा सवाल सदस्या भाग्यलक्ष्मी साटम यांनी केला. एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहता नये अन्यथा त्याला कृषी विभाग जबाबदार राहील, असा इशाराही साटम, मनोज रावराणे, मंगेश तांबे आदी सदस्यांनी दिला.

कणकवली पं. स.ची मासिक सभा पं. स.च्या सभागृहात सभापती सुजाता हळदिवे यांच्या उपस्थितीत झाली. उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

तापसरीबाबत पूर्वनियोजन नाही

जानेवारी ते आतापर्यंत लेप्टोसदृश 16 रुग्ण सापडले आहेत. यातील दोन रुग्ण या महिन्यात सापडले असून यात एकाचा मृत्यू व एकावर बांबोळीत उपचार सुरू आहेत. तापसरीबाबत गावागावात सर्व्हे सुरू असून डॉक्सीसायक्लीन गोळय़ांचे वाटप सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पण, तापसरी थैमान घालू नये, यासाठी बऱयाच ठिकाणी आरोग्य विभागातर्फे पूर्वनियोजनच दिसत नसल्याचा आरोप मनोज रावराणे यांनी केला. अनेक ठिकाणी पाणीनमुने दूषित असून त्याचीही चाचणी करावी, अशी मागणी रावराणे, प्रकाश पारकर यांनी केली.

… तर रस्ते ठेकेदारावर कारवाई व्हावी

खड्डेमय रस्त्यामुळे करुळ येथे नुकत्याच झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. नंतर स्थानिक ग्रामस्थांनी स्वत: श्रमदानाने खड्डे बुजविले. यापूर्वीही ग्रामस्थ अनेकदा श्रमदानाने रस्त्यांवरील खड्डे बुजविताना दिसतात. पण, याकामी जे ठेकेदार नेमले आहेत, ते काय करतात? असा सवाल रावराणे यांनी केला. हळदिवे यांनी एकाठिकाणी ग्रामस्थ खड्डे बुजवित असल्याचा फोटोही दाखविला. त्यावर खड्डय़ांबाबत ठेकेदार हलगर्जीपणा करत असल्यास त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी सूचना रावराणे यांनी केली. बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित नसतात, असे पारकर यांनी सांगितले. त्यावर बांधकाम विभागाची खास आढावा बैठक घ्यावी, अशी सूचना रावराणे यांनी केली.

वीज वितरणबाबत सदस्यांची नाराजी

वीज वितरणचे अधिकारी बैठकांना उपस्थित नसतात, याकडे रावराणे यांनी लक्ष वेधले. यापूर्वी या विभागाला बैठकीतून केलेल्या सूचनांच्या पूर्ततेचा अहवाल देण्यास सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवालही रावराणे यांनी केला. हळदिवे यांनीही वीज वितरणचे अधिकारी बैठकांना उपस्थित राहत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर गेल्या वर्षभरात ज्या सूचना वीज वितरणला दिल्या आहेत, त्याच्या पूर्ततेचा अहवाल त्यांनी महिनाभरात द्यावा. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना सदस्यांनी केली.

‘त्या’ वायरमनवरही कारवाईची मागणी

वायरमनच्या चुकीमुळे वाघेरी येथे म्हैस गतप्राण झाली. त्या वायरमनवर काय कारवाई झाली, असा सवाल रावराणे यांनी केला. त्यावर या वायरमनची बदली केल्याचे वितरणकडून सांगण्यात आले. मात्र, ही पळवाट असल्याचे हळदिवे यांनी सुनावले. म्हैस मृत झालेल्या शेतकऱयाला भरपाई मिळायलाच हवी. पण, त्या वायरमनवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रावराणे यांनी केली.

Related posts: