|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निवतीतील अनधिकृत बांधकामाची चौकशी करा!

निवतीतील अनधिकृत बांधकामाची चौकशी करा! 

वेंगुर्ले पं. स. सभेत ठराव : शासकीय जागेत इमारतीचे बांधकाम : शेतकरी नुकसानीपासून वंचित राहिल्यास कृषी सहाय्यक जबाबदार!

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

निवती-मेढा येथील शासकीय जमिनीत अनधिकृतपणे खाजगी इमारत बांघण्यात आली असून त्याची चौकशी करावी तसेच याबाबतचा अहवाल पुढील मासिक सभेत ठेवण्यात यावा, असा ठराव यशवंत उर्फ बाळू परब यांनी वेंगुर्ले पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती सुनील मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली पं. स.च्या बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी उपसभापती स्मिता दामले, पं. स. सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, सिद्धेश परब, साक्षी कुबल, गौरवी मडवळ, गटविकास अधिकारी उमा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या मतदार संघात विजयाची हॅटट्रिक केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पंचायत समितीच्या सदस्या गौरवी मडवळ यांचे बंधू सुहास वसंत पाटकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली.

नुकसानीपासून शेतकरी वंचित राहू नये!

परतीच्या पावसामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे एकही शेतकरी भातशेती व फळपिक नुकसानीपासून वंचित राहाता नये, याची काळजी घेण्यात यावी. वंचित राहिल्यास त्यास कृषी सहाय्यक जबाबदार राहातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक ग्रा. पं.मध्ये अर्ज ठेवण्यात आले आहेत. शेतकऱयांनी ते भरुन द्यावेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक त्या अर्जाची सत्यता पडताळणी करतील. जे शेतकरी खंडाद्वारे शेती करतात त्यांची वेगळी यादी करण्यात येणार आहे. तसेच सातबारावर पाच, सहा नावे असतील व त्यातील एखादाच येथे शेती करीत असेल, तर येथे शेती करणाऱयालाच त्याचा फायदा घेता येणार असल्याचे यावेळी कृषी अधिकारी यांनी सांगितले.

इतिवृत्तावरून पुन्हा खडाजंगी

27 जुलैच्या सभेस पं. स. सदस्य श्यामसुंदर पेडणेकर हे उपस्थित असतानाही इतिवृत्तामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. यापूर्वीही अनेकवेळा अशा चुका झाल्याने या विषयावरून खडाजंगी चर्चा करण्यात आली. इतिवृत्त लिहून घेण्याचे काम कोण करतो? ते लिहून झाल्यावर ते वाचले जात नाही का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.

समुद्र किनारपट्टी भागात शासनामार्फत जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यापासून त्यांचे मानधन बंद करण्यात आले आहे. ते पुन्हा सुरू करण्यात यावे. ‘क्यार’ चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. येथील जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यालयात दोन इंजिनियर आहेत. मात्र क्लार्क व शिपाई पदे भरली गेली नाहीत त्यामुळे कामात दिरंगाई होत असल्याने ती पदे त्वरित भरण्यात यावी, परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दुरुस्त करण्यात यावी, कनयाळ रेडी येथे बीएसएनएलला नेटवर्क मिळत नसल्याने तेथे बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात यावा, दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरशिवाय अनेक पदे रिक्त आहेत, ती त्वरीत भरण्यात यावी, शिरोडा तलाटी कार्यालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप उद्घाटन करण्यात झाले नाही ते त्वरित करण्यात यावे, मातोंड ग्रामसेवक हळदणकर हे कामात हयगय करीत असल्याने व ते जेथे बदली होऊन जातात तेथील लोकांच्या तक्रारी येत असल्याने त्यांची तालुक्याबाहेर बदली करण्यात यावी, पंचायत समितीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेतही बाहेर फिरताना दिसत असल्याने गटविकास अधिकाऱयांनी त्याकडे लक्ष द्यावे, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी विविध खात्याचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी यांनी आभार मानले.

Related posts: