|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कर्तारपूरवरून पाकची पुन्हा कोलांटी

कर्तारपूरवरून पाकची पुन्हा कोलांटी 

पहिल्या दिवशीही वीस डॉलर शुल्क आकारण्याचा निर्णय, शीख भाविकांमध्ये नाराजी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येत्या दोन दिवसात भारत आणि पाकिस्तानमधील कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. तथापि, पाकिस्तानने आपली धरसोड वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. उद्घाटनाच्या दिवशी यात्रा करणाऱयांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही हा निर्णय पाकिस्तानने फिरविला असून पहिल्या दिवशीही प्रत्येक यात्रेकरू मागे 20 डॉलर (साधारणतः 1400 रुपये) शुल्क आकारण्याचा निर्णय घोषित केला आहे. भारताने यावर नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तानातील कर्तारपूर येथे शिखांचे पहिले धर्मगुरू गुरु नानक यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. तेथे त्यांनी गुरुद्वाराची स्थापना केली. त्यामुळे हा गुरुद्वारा भारत व जगभरातील शिखांसाठी पवित्र तीर्थस्थान आहे. पाकिस्तानने तेथे शीख यात्रेकरुंना जाण्याची अनुमती द्यावी, ही मागणी गेल्या साठ वर्षांपासून होत आहे. ती आता पूर्ण होण्याच्या बेतात आहे. भारत आणि पाकिस्तानने कर्तारपूरपर्यंत मार्गिका स्थापन केली असून ती 18 किलोमीटर लांबीची आहे.

हा धार्मिक यात्रेचा प्रश्न असल्याने पाकिस्तानने शुल्क आकारू नये, अशी मागणी भारताने केली होती. तसेच व्हिसाशिवाय यात्रा करू दिली जावी, असाही भारताचा आग्रह होता. पाकिस्तानने व्हिसासंबंधीचा आग्रह मानला. तथापि, शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतलेला नसल्याने भाविक नाराज आहेत.

पाकिस्तानचे प्रेम आर्थिक लाभावरच…

या मार्गिकेवरून प्रतिदिन पाच हजार यात्रेकरुंना दर्शनाची अनुमती देण्यात येणार आहे. शिखांच्यादृष्टीने असलेले कर्तारपूरचे महत्त्व लक्षात घेता यात्रेकरुंची संख्या वर्षाला किमान दहा लाख इतकी असू शकते. या सर्वांकडून पाक प्रत्येकी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याने त्या देशाला दोन कोटी डॉलर्सचे (2800 कोटी रुपये) उत्पन्न मिळू शकते. पाकिस्तानच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला हा आधार मिळू शकतो, असे जाणकारांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उद्देश भारताकडून पैसा मिळविणे हाच आहे, अशीही टीका होत आहे.

Related posts: