|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नारळ, सुपारीच्या फळधारणेवर परिणाम

नारळ, सुपारीच्या फळधारणेवर परिणाम 

जिल्हय़ात पावसामुळे नारळ, सुपारी पीक धोक्यात

नारळाचे 19 हजार 560 हे. तर सुपारीचे 1154 हेक्टर उत्पन्न

सुपारीवर कोळे रोगाचा प्रादुर्भाव

पावसामुळे माडांच्या सुई मोडण्याचे प्रकार

बदलत्या हवामानामुळे बागायदार चिंतेत

तेजस देसाई / दोडामार्ग:

शेतकरी हा लाखाचा पोशिंदा म्हटले जाते. पण, नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना शेतकरी उद्धस्त होताना दिसत आहे. भले आपल्याकडे खरेदी करण्यासाठी संपत्ती असेल, पण शेतात पिकलेच नाही तर बाजारपेठेत उपलब्ध कसे होणार?, शेतमाल हा पिढय़ान्पिढय़ा साठवणूक करू शकत नाही. तो दरवर्षी शेतात पिकवायलाच हवा. पण, हा पिकविणारा तुमचा आमचा लाखाचा पोशिंदा संकटात आहे. त्याला सावरायला हवे. फळबागातीतील नारळ आणि सुपारीची जिह्यातील स्थिती पाहता शेतकऱयांना तुटपुंजी नुकसान भरपाई न देता समर्थपणे उभे राहण्यासाठी शासनाने साथ द्यायलाच हवी.

सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा विचार करता कृषिप्रधान असणारा जिल्हा म्हणून या जिल्हय़ाची ओळख आहे. जवळपास दोन लाख हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. पैकी नारळ व काजूचा बागायतीचा विचार करता नारळाचे 19 हजार 560 हे. तर सुपारीचे 1154 हे. मध्ये उत्पन्न आहे. मात्र, सतत कोसळणारा पाऊस, बदलते हवामान यामुळे दोन्ही पिकांच्या फळधारणेवरून कमालीचा परिणाम होणार आहे. याबाबत सुपारी बागायतदार सतीश कामत म्हणाले, यावर्षी सुपारी फळाची प्रचंड गळ झाली आहे. शिवाय कोळे रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला. त्यामुळे उत्पन्न खालावले. अशी सुपारी विक्रेते घेत नसल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. माडाच्या बाबतीत युवा बागायतदार राजू देसाई म्हणाले, सतत कोसळणाऱया पावसामुळे माडांच्या सुई मोडण्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय काही वर्षांपासून नारळ फळ खूप छोटे येते. ते या बदलत्या वातावरणात अधिक पुढील काढणीवेळी जाणवणार आहे. यावर्षी दर चांगला आहे. प्रती फळ 15 ते 20 पर्यंत हा दर मिळतो. पण, बदलत्या हवानामुळे बागायतदार चिंतेत आहेत.

शास्त्रज्ञांचा सल्ला

 याबाबत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ मोहन दळवी म्हणाले, सुपारीला पावसाळय़ात बुरशी लागते. जी प्रत्यक्षदर्शी पान, फळ किंवा शिपटे यावर दिसून येते. तिला जाळून नष्ट करावे. शिवाय जैविक नियंत्रण द्रावणाची (बनविण्याची पद्धत तज्ञांकडून जाणून घ्यावी) फवारणी करावी. नारळाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास झाडाची सुई मोडणे, त्याला भोंगा लागणे असा प्रकार आढळून आल्यास ती त्या ठिकाणाहून कापावी. शिवाय त्या ठिकाणी बुरशीजन्य द्रावणाची फवारणी करावी. नारळ फळ छोटे येणे, असे होत असल्यास त्या ठिकाणी कोळी कीडीचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. त्यासाठी मुळांच्या ठिकाणी निम पेण दिल्यास चांगला रिझल्ट मिळतो. शेतकऱयांनी घाबरण्याची गरज नाही, योग्य सल्ला घ्यावा.

तालुकानिहाय नारळ व सुपारी पिकाखालील क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका               नारळ               सुपारी

दोडामार्ग             1730                195

सावंतवाडी           4650                465

वेंगुर्ला                 3075               182

कुडाळ                 4320               245

कणकवली             1160                65

देवगड                  690                 46

वैभववाडी              345                 26

मालवण                 3590             175

Related posts: