|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग विलीनीकरणाचा मुद्दा तापला

दोडामार्ग विलीनीकरणाचा मुद्दा तापला 

चळवळीमागे गोव्यातील नेत्यांचे ‘लॅण्ड कनेक्शन’ : बाबुराव धुरींचा घणाघात

विलीनीकरण समर्थकांचे आव्हान : शिवसेनेने स्वीकारले

गोवा मुख्यमंत्र्यांनी जमीन खरेदी : केल्याचा पुरावा केला सादर

प्रतिनिधी / दोडामार्ग:

 दोडामार्ग गोव्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्दय़ाला गोवा राजकारण्यांच्या ‘लॅण्ड कनेक्श्न’ची किनार लागली आहे. गोव्यातील राजकीय नेते जमिनी खरेदी करीत आहेत, असा आरोप दोडामार्ग शिवेसना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला होता. त्याला विलीनीकरण समर्थकांनी ‘धुरींनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी’, असे आव्हान दिले होते. त्याला बाबुराव धुरी यांनी शुक्रवारी सामोरे जात चक्क गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जमीन खरेदी केल्याचा पुरावा पत्रकार परिषद घेत सादर केला. एवढेच नव्हे, तर बंद लिफाफा दाखवित तो उघडल्यास अनेकांच्या कुंडल्या बाहेर येतील. ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असा इशारा देत खळबळ उडवून दिली.

  धुरी म्हणाले, दोडामार्ग तालुका कोणाही धनदांडग्यांना विकू देणार नाही, दोडामार्ग अखंड महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न झाल्यास तो प्रयत्न हाणून पाडू. अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी गोवा मंत्रिमंडळ सावंतवाडीत विधानसभा मतदारसंघात का आले होते? याचा उलगडा आता होत असून त्यांचा डोळा येथील जमिनीवर आहे. मायनिंग, दगड उत्खनन व अन्य गोष्टींसाठी सदर जमिनीचा वापर होईल. याचा एक भाग म्हणजे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुमारे पाच एकर जमीन तळेखोल येथे विकत घेतली. अशाप्रकारे गोव्याचे धनदांडगे लोक दोडामार्गची सर्व जमीन विकत घेतील व दोडामार्गात मायनिंग व अन्य विनाशकारी प्रकल्प सुरू करतील. यासाठीच काही लोकांना हाताशी धरून दोडामार्ग तालुका गोवा विलिनीकरणाचा डाव सुरू असल्याचा गौप्यस्फोट बाबुराव धुरी यांनी दोडामार्ग येथे शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

   यावेळी बाबुराव धुरी यांच्यासह युवासेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस, जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस, कानू दळवी, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, बबलू पांगम,  शैलेश गावडे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

  दोडामार्ग विलीनीकरणाची चळवळ याचाच भाग असून हय़ा गोष्टी दोडामार्गमधील जनता खपवून घेणार नाही. आम्ही कोणतीही दादागिरी करीत नसून फक्त अखंड महाराष्ट्र राहावा. दोडामार्ग तालुका महाराष्ट्रापासून वेगळा करू नये. 105 लोकांचे हौतात्म्य फुकट जाऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे धुरी म्हणाले.

पालकमंत्र्यांवरील नाहक टीका खपवून घेणार नाही!

  दोडामार्ग येथील पत्रकार परिषदेत धुरी यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमीन विकत घेतलेली खरेदीखताची माहिती अधिकारात मिळविलेली कागदपत्रे दाखवली. पुरावा द्या म्हणणाऱयांना हा घ्या पुरावा, असेही सांगितले. तसेच आणखी एक बंद लिफाफा दाखवित यात धन दांडग्यांना जमिनी विकणाऱया लोकांची नावे व सीडीद्वारे परिपूर्ण माहिती असल्याचे सांगत हा लखोटा उघडताच समोर येईल. त्यामुळे दोडामार्ग विलीनीकरणाची चळवळ थांबवा, असे आवाहनही त्यांनी करीत पालकमंत्र्यांवरील नाहक टीका खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले.

विरोध करणाऱयांनी स्वतःचा विकास डोकावून पहावा!

   विलिनीकरण समर्थन करणाऱयांनी धुरी यांच्या कुटुंबियांना विचारले तरी ते विलीनीकरण हवे, असे सांगतील असे सांगितले होते. मात्र, आपण एकच सांगतो, जे विरोध करीत आहेत, त्यांच्या घरात महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत. ते महाराष्ट्र सरकारचा पगार घेतात. तरीही त्यांना विकास व रोजगार दिसत नाही. पालकमंत्री, खासदार यांच्यावर टीका करण्यापूर्वी काही वर्षे मागे जाऊन पहा. दोडामार्गात गावागावात जाण्यास रस्ते नव्हते, बोलायला रेंज नव्हती, आता जवळपास सर्वच गाव दळणवळणाने जोडली गेली आहेत. पिढय़ान्पिढय़ा रेंज नसलेल्या गावांमध्ये नेटवर्क आहे, ही वस्तुस्थिती आहे. डोंगरी तालुका वगळला होता. तो पुन्हा करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांचे भले झाले, असे त्यांनी सांगितले.

Related posts: