|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मित्र, नातेवाईकांकडे चौकशी सुरू

मित्र, नातेवाईकांकडे चौकशी सुरू 

घटनास्थळी अन्य चौघेजण असल्याचे निष्पन्न

प्रतिनिधी / बांदा:

भालावल-धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (21) याचा मृतदेह गुरुवारी सकाळी बंधाऱयात आढळला होता. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या सोबत अन्य तिघेजण असल्याचे सांगत त्यांच्यावर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांनी भालावल येथे जात त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब घेतले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या एकाची चौकशी केली असता आपल्यासोबत तेथीलच अन्य एकजण असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर दोघांना सायंकाळी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलीस ठाण्यात समीरच्या नातेवाईकांनाही बोलावण्यात आले होते. तर समीरसोबत पोहोण्यास गेलेल्या अन्य दोन नातेवाईकांकडून परुळे येथे जात घटनेबाबत माहिती घेणार असल्याचे पोलीस ]िनरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.

समीर हा बुधवारपासून घरातून बेपत्ता होता. गुरुवारी त्याचा मृतदेह जवळच असलेल्या पाणलोट बंधाऱयात तरंगतांना दिसला. त्याच्या काकाने बांदा पोलिसांत खबर दिली. समीर बुधवार दुपारपासून घरातून बाहेर होता. त्याच्यासोबत आणखी तिघेजण गेले होते. त्यात एक शाळकरी मुलगाही होता, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. ते तिघेही त्याला तेथेच टाकून आपल्या घरी कुडाळला गेल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. ज्यावेळी मृत समीरच्या तोंडाला व नाकाला मार लागल्याच्या खुणा होत्या. बुडून मृत्यू झाला असेल तर पोटात पाणीच नव्हते. तसेच एक रात्र पाण्यात मृतदेह राहिल्याची शक्यता धरली तर तो फुगायला हवा होता, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. मात्र, तसे झाले नव्हते. त्यामुळे समीरच्या मृत्यूबाबत ग्रामस्थांसह कुटुंबीय व पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. येथील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वर्षा शिरोडकर यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह कोकरे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यात समीर याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

 समीर आपल्या तीन मित्रांसोबत गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोर स्पष्ट केले होते. मात्र, तपासात चौघे असल्याचे स्पष्ट झाल्याने गूढ वाढले आहे. जर तो पाण्यात बुडाला तर त्याच्यासोबत असलेले अन्य तिघेजण आपल्या गावी का गेले, असा संशय व्यक्त होत आहे. त्यांच्याकडून समीरचा मृत्यू नेमका कसा झाला? पाण्यात तो का उतरला आणि स्वतः पाण्यात उतरला तर त्याने आपला मोबाईल एका बाजूला आणि कपडे झाडीत का ठेवले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भालावल येथे जात नातेवाईकांचे जबाब घेतले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एकाला बांदा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. प्राथमिक चौकशीदरम्यान तो पाण्यात बुडाल्याने आपण घाबरून घरी पळाल्याचे त्यांनी सांगितल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. अन्य दोघांचे जबाब घेतल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Related posts: