|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आवाज बनला रोजीरोटीचे साधन

आवाज बनला रोजीरोटीचे साधन 

कुडासेतील युवकांने मिळविला अंतः आवाजावर ‘विजय’

विजय फाले यांचा ‘आवाज’ नाबाद 150 

युवकांत ठरतोय आकर्षण

शिक्षक पदविकाधारक असूनही निवडले चॅलेंजिंग क्षेत्र

तेजस देसाई / दोडामार्ग:

एखाद्याचा हुबेहूब आवाज काढण्याची कला बघण्या आणि ऐकण्याएवढी  निश्चितच सोपी नाही. ती दैवी देणगी जेवढी आहे, तेवढीच त्याला प्रयत्नांची जोडही महत्वाची आहे. शिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी शिक्षक पदविका शिक्षण पूर्ण करणारा दोडामार्ग कुडासे गावातील युवक विजय रामा फाले आता एक युवा मिमिक्रीकार म्हणून पुढे येत आहे. महत्वाचे म्हणजे विविध प्रकारचे यावर्षी त्याने 150 आवाज काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

  याबाबत आवाजाचे युवा जादूगार श्री. फाले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, चाळीसपेक्षा जास्त कलाकारांचे आवाज, प्राणी-पक्षी यांचे विविध आवाज हुबेहुब काढण्याचे कौशल्य स्वत: प्रशिक्षणाशिवाय स्वत:च्या प्रयत्नामुळे आणि प्रयत्नाला दिलेली साथ यामुळे आज 150 पेक्षा जास्त प्रयोग केले. महाराष्ट्र, पुणे, गोवा, कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी प्रयोग केले. कुडाळ डिगस येथे 2011 साली पदविका पूर्ण करीत असताना सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्वतःमधील कौशल्य विकसीत होण्यास मदत मिळाली. असे कार्यक्रम करीत असताना दोन कलाकारांचे आवाज काढतो, असे मित्रमंडळी व शिक्षकांनी सांगितल्यामुळे माझ्यातील आवाजाचा मला स्वतः अंदाज घेता आला. त्यानंतर मग हळुहळू स्वःमेहतीने अजून काही कलाकारांचे आवाज आपण काढू शकतो. यासाठी प्रयत्न सुरू केले. मनाशी ठरवलं तर आवाज परिपूर्ण झाल्यानंतरच स्टेजवर चढायचं म्हणूनच पहिला प्रयत्न सरस्वती विद्यामंदिर कुडासेच्या स्नेहसंमेलनात काही आवाज सादर केले. नाना पाटेकर यांचा आवाज सर्वांना भावला. प्रेक्षकांनी कार्यक्रमामधील काही त्रुटीही दाखवून दिल्या. मनात थोडी नाराजी निर्माण झाली. आपण स्टेजवर उभं राहण्याचे स्वप्न स्वप्नच बनवून राहत की काय? असे एकाच क्षणी मनाला वाटले. पूर्वीचा वाईट एक अनुभव पाठिशी होता. चौथीमध्ये असताना शिक्षकांनी बसविलेल्या ग्रुप डान्समध्ये स्टेजवर जायची भीती वाटल्यामुळे ऐनवेळी डान्स सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे मी प्रेक्षकांत लपून बसलो. दुसऱया दिवशी शिक्षकांनी बेदम मारले. कदाचित ही गोष्ट मनात तशीच घर करून राहिली होती. म्हणून तर नाही ना की परमेश्वराला मला स्टेजवर पाठवायचे होते. तेही प्रेक्षकांना हसवायला.

प्रारंभी मोबदल्याचा विचार न करता प्रयोग!

 भूतकाळाविषयी बोलताना फाले म्हणाले, सुरुवातीच्या काळात मिमिक्रीचे प्रयोग अनेक ठिकाणी मोबदल्याचा विचार न करता केवळ संधी मिळावी व आपले नाव व्हावे, यासाठी केले. त्यानंतर जसजशी मागणी वाढली, लोकांना आवडू लागले. आवाजाचा अभ्यास स्वतः केला. एखाद्या कार्यक्रमाला जाण्याअगोदर सराव करावा लागे. कार्यक्रमाला कसे बोलावे, कशा प्रकारे सादरीकरण करावे, या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. स्क्रीफ्ट स्वतः लिहिणं, ते आवाज टिकविण्यासाठी काही बारकावे टिपले. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सुधारणा होत गेली. हे करत असताना घरच्यांना देखील खूप सपोर्ट केला. त्यात आई-वडील, काका तसेच मित्रपरिवार यांनी देखील योग्य साथ दिली. त्यामुळेच ही उभारी घेण्यास हातभार लागला.

आवाजासाठी अशी घेतली मेहनत

  अनेक प्रकारचे आवाजात बोलणे म्हटले तरी ते देखील सोपे नाही. नाना पाटेकर यांचा आवाज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यानंतर मग अजून आवाज वृद्धिंगत केले. मनात हे चक्र सुरू असतानाच हे चक्र पूर्ण करण्यासाठी धडपड मात्र फार मोठी होती. त्यासाठी गोव्यात काम करुनही मोकळय़ा वेळेत, सुट्टीत आवाजांचा अभ्यास करणे त्यासाठी रियाज करणे यासाठी भरपूर मेहनत घेतली. गोव्यात काम करत असताना तिथल्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या लोकांच्या चेहऱयावर हास्य फुलविण्याचे प्रयोग केले. मग हळुहळू तालुक्यातील तसेच जिल्हय़ातील कार्यक्रमात आवाज सादर करण्यासाठी संधी शोधू लागलो. मोठमोठय़ा महोत्सवात कार्यक्रमासाठी संधी मिळून प्रेक्षकांपर्यंत कसे पोहचावे, याची समज आली होती. बऱयाच संधी मिळाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळून कार्यक्रमासाठी बोलविणे येऊ लागले. हे करीत असताना मराठी चित्रपटात देखील छोटय़ामोठय़ा भूमिका मिळू लागल्या. 2012 पासून सुरू असलेला प्रवास 2018 पर्यंत असाच सुरू होता. यात अनेक पुरस्कारही मिळाले. रात्रीस खेळ चाले या सारख्या मालिकेत छोटीशी भूमिका मिळाली. येणाऱया आगामी चित्रपटात, त्याचप्रमाणे मालिकामध्ये काम करण्यासाठी आपले प्रवास इथेच न थांबवता पुढे जाण्याची धडपड मात्र संपली नाही. आवाजाचे बारकावे, कलाकौशल्य टिपण्यासाठी सोशल मीडियाचा बऱयाच प्रकारे वापर केला. त्यामुळे आजपर्यंत माझ्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश आले,, असे मी समजू शकतो. त्यातल्या त्यात लाफ्टर शो मधील सुनील पाल, चेतन शशीताल यांच्या आवाजातील बारकावे टिपले. त्यांचे कार्यक्रम ऐकत असतो, असे फाल सांगतात.

आतापर्यंत मिळालेले सन्मान

 2017 साली कोल्हापूर येथे एका साहित्य संमेलनात गोव्याचे सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 2017 साली मुंबई मांटुगा येथे नामवंत अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते ‘दिव्यदृष्टी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. 2018 साली पुणे येथे मणिभाई प्रतिष्ठान चा पुरस्कार जलसंपदा मंत्री विजय शिवनारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Related posts: