|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन 

मुंबई / प्रतिनिधी

राज्याचे निवफत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. ते 79 वर्षांचे होते.

त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते. इनामदार यांनी गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडल हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले होते. इनामदार यांना खोटे आणि चुकीचे घडलेले कधीही खपत नसे. त्यामुळे त्यांनी आपली कारकिर्द पणाला लावून कायम पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचेही ते वारंवार मुलाखतींमधून सांगत असत.

इनामदार हे पोलीस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांच्यातील माणूस कायम जागा होता. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या भगवद्गीतेचा मोठा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते. लेखक म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. खुसखुशीत भाषा शैली आणि विनोदी बुद्धीमुळे ते ऐकणाऱयांच्या मनाची सहज पकड घेत असत. इनामदार यांची पोलीस महासंचालक म्हणून कारकिर्द गाजली. त्यातच त्यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावत चालल्याने त्यांच्यावर हरकिसनदास रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली. मरिन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related posts: