|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा 

राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार

राज्यातील जनतेचे मानले आभार

मुंबई / प्रतिनिधी

मावळत्या तेराव्या विधानसभेची मुदत संपण्यास 24 तासाचा अवधी शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे.

विद्यमान विधानसभेची मुदत शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजता संपत आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस यांन शुक्रवारी संध्याकाळी 4.15 वाजता राजभवनावर जाऊन कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपला राजीनामा सादर केला. राज्यपालांनी फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जात असल्याने राज्य मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे.

यावेळी फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, संजय कुटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन गेल्या पाच वर्षातील कामगिरीची माहिती दिली. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची उजळणी केल्याने फडणवीस यांची आजची पत्रकार परिषद ही त्यांच्या निरोपाची होती, असे मानले जाते. गेली पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल फडणवीस यांनी जनतेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच अधिकारी-कर्मचाऱयांचे आभार मानले. मित्र पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल आभार व्यक्त करताना फडणवीस यांनी शिवसेना तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव घेण्याचे टाळले.

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राला पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार दिले. या कालावधीत महाराष्ट्राला सर्व आघाडय़ांवर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात जी वेगवेगळी संकटे आली त्या संकटाचा समर्थपणे सामना केला. दुष्काळ आणि अतिवृष्टीत सरकारने शेतकऱयांच्या पाठिशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभारले तसेच प्रकल्प मार्गी लावले. महाराष्ट्रात खूप समस्या आहेत आणि त्या पुढील पाच वर्षात संपणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

राज्यपालांनी माझ्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्याला नवीन धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे राज्यपाल सांगतील त्या दिवसापर्यंत मी काम करणार.

देवेंद्र फडणवीस

Related posts: