|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » …तोपर्यंत शिवसेनेशी चर्चा नाही !

…तोपर्यंत शिवसेनेशी चर्चा नाही ! 

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा

आम्ही नव्हे तर शिवसेनेने चर्चा थांबवली

युतीत संघर्ष चिघळला

मुंबई / प्रतिनिधी

शिवसेनेने गेल्या दहा दिवसात भाजपचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत रहायचे आणि त्याच पक्षाच्या नेत्यांवर मुखपत्रातून तसेच बाहेर जाऊन टीका करायची हे आम्हाला मान्य नाही. मोदींवरील टीका ही आमच्या मनातील खंत आहे आणि ती दूर होईपर्यंत शिवसेनेची चर्चा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला.

मी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना फोन केले. परंतु, त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे आम्ही नाही तर शिवसेनेने चर्चा थांबवल्याचा दावा फडणवीस यांनी केला. माझ्यासमोर कधीही अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद हा नव्हता. यासंदर्भात एकदा बोलणी होऊन ती फिस्कटली आणि थांबली होती. पुन्हा एकदा बोलणी झाली. परंतु, निर्णय झाला नाही. अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच वर्षाचा विषय झाला असेल तर ते मला माहित नाही. यासंदर्भात मी माझी भूमिका मांडली आणि ती कोणाला खोटं ठरविण्यासाठी मांडली नव्हती, असा खुलासाही फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये एकमत नाही. युतीच्या या सत्तासंघर्षात उद्या, शनिवारी तेराव्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर फडणवीस यांनी आक्रमक होत उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्याच दिवशी उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे विधान केले. ठाकरेंचे हे विधान आम्हाला धक्का होता. जनतेने महायुती म्हणून निवडून दिले असतानाही शिवसेनेने सर्व पर्याय खुले असल्याचे का म्हणावे? असा प्रश्न आम्हाला पडला होता. निवडणूक निकालानंतर मी उध्दवजींचे आभार मानले होते. परंतु, दुर्दैवाने गेल्या 15 दिवसात ज्या प्रकारची विधाने माध्यमांमधून होत होती ती योग्य नव्हती. यातून निर्माण झालेले समज-गैरसमज चर्चेतून संपवणे शक्य होते. परंतु, शिवसेनेने चर्चाच करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा करायला वेळ नाही. परंतु, विधानसभेची निवडणूक ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढवली त्यांच्याशी दिवसातून तीन-तीनवेळा चर्चा करण्यासाठी वेळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावे हीच शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनची मानसिकता होती. शरद पवारांनी विरोधी पक्षात बसू असे स्पष्ट केल्यानंतर संवाद व्हायला हवा होता. परंतु, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशीच चर्चा केली. शिवसेनेचे हे धोरण योग्य नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

सरकार भाजपचेच येईल

येत्या काळात जे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येईल. नवे सरकार भाजपचेच असेल यावर माझा संपूर्ण विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

फडणवीस यांचा हल्लाबोल

जनतेने महायुतीला मोठा जनादेश दिला आहे. या जनादेशाचा अनादर करणे आणि पुन्हा निवडणुका लादणे चुकीचे आहे. निवडणूक लादण्यापेक्षा राज्यात नवे सरकार दिसले पाहिजे. त्यासाठी योग्य ते प्रयत्न करू.

आमदार फोडत असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. या संदर्भात कोणताही पुरावा आणून द्यावा किंवा त्यांनी माफी मागावी. भाजप सरकारसाठी कधीही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आम्हाला त्याची आवश्यकता भासणार नाही.

शिवसेनेकडून मोदींवर होणारी टीका ही मनाला लागलेली गोष्ट आहे. मोदींवर टीका सुरूच राहणार असेल तर असे सरकार कशासाठी चालवायचे? भाजपने शिवसेनेवर कधीही टीका केली नाही. बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनीय असून भाजपने त्यांचा कधीही अनादर केला नाही.

मी शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही. कारण आजूबाजूचे लोक वक्तव्ये करतात त्याने मीडिया स्पेस व्यापते. पण त्यातून सरकार तयार होत नसते. ते ज्या भाषेत बोलतात त्यापेक्षा जबरदस्त भाषेत बोलण्याची आमची क्षमता आहे. परंतु, आम्ही ते करणार नाही. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही.

गेल्या पाच वर्षात उध्दव ठाकरेंशी माझे जवळचे संबंध राहिले. भविष्यातही तसे राहतील. पाच वर्षात मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो, बोलून मार्ग काढला. आताही मी स्वत: फोन केले. परंतु, त्यांनी ते घेतले नाहीत. 

Related posts: