|Thursday, February 27, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भाजप-शिवसेनेकडून मतदारांच्या विश्वासाला तडा

भाजप-शिवसेनेकडून मतदारांच्या विश्वासाला तडा 

1995 च्या सत्तेनंतर कुरघोडीची शिक्षा म्हणून जनतेने 15 वर्षे सत्तेपासून दूर ठेवले याचा विसर 5 वर्षातच भाजप आणि शिवसेनेला पडला. ‘आमचं ठरलंय’ असे सांगून मते घेतली पण नंतर जो घोळ घातला त्यातून विश्वासाला तडा गेला.

हा मजकूर लिहिला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला होता. नंतरच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार आरोप केले होते. तर पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करत तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची वाटणी करणे जमत नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असे सांगताना अनेक जुने संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला शह दिला होता. त्यामुळे राज्यात भविष्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करणार का आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडणार की भाजपच फोडाफोडी करून सत्ता स्थापन करणार किंवा राष्ट्रवादीशी जुळवून घेणार याबाबत चर्चा सुरू झालेली आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच सत्तेची समसमान वाटणी करायचे ठरले होते की नाही, हा आता 8 महिन्यांनी वादाचा मुद्दा झाला आहे. मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांना हवे आहे आणि संख्याबळाने दोघांनाही हे पद मिळवण्याची संधी दिली असली तरी त्यासाठी एकतर एकत्र यावे लागेल किंवा विरोधी विचाराच्या पक्षांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. मतदाराने दिलेला हा कौल सर्वच राजकीय पक्षांची पिसे गाळणारा ठरला आहे. त्यामुळेच सत्ता स्थापनेची जबाबदारी एकमेकावर ढकलून सर्वांनी वेळकाढूपणा केला आहे. या वेळकाढूपणामुळेच मुख्यमंत्र्यांनाही राज्यपालांकडे राजीनामा सोपवावा लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असे खुद्द अमित शहांनी आपल्याला सांगितल्याचा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीचा विषय काढला होता, तो शहा यांनी निवडणुकीनंतर पाहू असे सांगून टोलवला होता असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटना घडत असतानाच उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनाभवनात तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन भाजपला बोल लावले. आपल्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न भाजपने करू नये. आपण जे काल बोललो तेच आजही बोलतो आहोत आणि मुख्यमंत्र्यांना मोदींवर शिवसेनेने केलेली टीका खूपच टोचत असेल तर त्यांनी आज भाजपने ज्यांच्या ज्यांच्याशी जुळवून घेतले आहे त्या उदयनराजे भोसलेंपासून दुष्यंत चौटालांच्यापर्यंतच्या सर्वांची वक्तव्ये तपासावीत असे सांगत ती वक्तव्ये पत्रकार परिषदेत वाजवली. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा आम्ही नव्हे तर शिवसेनेने थांबवली, राष्ट्रवादीशी चर्चेला वेळ होता पण भाजपसाठी नव्हता, त्यांनी मोदींवर टीका केली, आम्ही फोडाफोडी करणार नाही आदी केलेली वक्तव्ये मागे पडली आहेत. राज्याच्या सत्तेतील दोन प्रमुख पक्षांचा सुंदोपसुंदीचा परिणाम या पक्षांच्या मतदारावर काय होणार आहे याचा विचार दोन्ही पक्षांनी केला नसावा. किंवा त्यांना त्यांच्या मतदारांची खात्री असावी. कारण हिंदुत्वाच्या म्हणत असले तरी सत्ता मिळविण्याच्या मुद्यावरच ते एकमेकासोबत आले आहेत. सत्ता किंवा जादा जागांसाठी दोघांमध्ये 30 वर्षे कायम तणाव होता. राज्य आणि देशातील बदलत्या स्थितीनेच त्यांना नेहमी एकत्र ठेवले. 1995 च्या सत्तेत एकत्र असले तरी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यातील कुरघोडी सर्वश्रुत आहे. ही कुरघोडी भुजबळ सेनेतून फुटले तेव्हा जोशींचे विरोधी पक्षनेतेपद हिसकावण्यातही दिसली होती. खुद्द विलासराव देशमुख यांनी मुंडे यांना हाताला धरून जोशींच्या खुर्चीवर बसवले होते. 95च्या सत्तेत तो कटूपणा वाहून गेला नाही. पुढे 99 च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी ज्या खेळय़ा दोन्ही पक्षांनी केल्या, त्यामुळे युतीची सत्ता गेली. परिणामी 15 वर्षे आघाडीचे राज्य टिकले. मुंडे, गडकरी, राणे यांच्यापासून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खूप दूर गेली. 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आज सेना-भाजपमध्ये जशी गळेकापू स्पर्धा सुरू आहे तशीच सुरू झाली आणि ही संधी साधून आपले राज्य येईल या विश्वासावर सेना आणि भाजप स्वतंत्र लढले. भाजप तेव्हा सत्तेवर आला आणि आता सेनेला दाबता येईल असे ठरवून पवारांनी भाजपला साथ दिली. आघाडी धर्म त्यागणारी ही साथ पवारांना खूपच महागात पडली. भाजपच्या अटी, शर्तीवर सेना सत्तेत आली. पाच वर्षे अपमान सोसूनही सत्तेत राहिली. आता निवडणुकीच्या निकालाने मतदारांनी अशी काही स्थिती केली आहे की, भाजप शिवसेनेशिवाय सत्तेत येऊ शकत नाही आणि सेना भाजपशिवाय यायची तर दोन्ही काँग्रेसशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे गडकरी शिवसेनाप्रमुखांच्या काळात ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र आठवणीने सांगत आहेत. त्याचवेळी देशात भाजप, राज्यात शिवसेना हे धोरण बाळासाहेबांच्या काळात होते याकडे शिवसेना निर्देश करते आहे. शिवसेनेच्या जागा कमी आहेत आणि लोकांनी महायुती म्हणून मतदान दिले आहे. काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता आणायला नाही असा सोशल मीडियातून भाजप प्रचार करत आहे. तर मुख्यमंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीवेळचा युती ठरल्याचा व्हीडिओ शिवसेना प्रसारित करत आहे. ज्यामध्ये सत्तापदे आणि जबाबदाऱयांचे समान वाटप करण्याचे ठरले असल्याचे मुख्यमंत्री बोलत असल्याचे दाखवले जात आहे. हे सत्यच आहे की, सर्व राजकीय पक्षांना जनतेने स्वतंत्रपणे मतदान केले आहे. मात्र तरीही युती आणि आघाडी म्हणूनच हे मतदान मिळालेले आहे. भाजप जेव्हा संजय राऊत हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते यावर आक्षेप घेते तेव्हा भाजपच्यावतीने आपण पवारांशी चर्चेला आलो आहोत या आठवलेंच्या वक्तव्याचा त्यांनाही विसर पडलेला असतो. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य नाही आणि मोदी, शहा त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत कारण त्यांना त्यांचे आक्रमक राजकारण प्रिय आहे.

अशावेळी महाराष्ट्रावर त्याचे परिणाम होत आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे आणि दोघांशिवाय सत्ता होत नसेल तर सामंजस्य केले पाहिजे. मात्र दोन्ही बाजू फक्त आक्रमकच होत राहतील तर काय साध्य होणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 15 वर्षे जनतेने मतदान दिले. मात्र जेव्हा त्यांच्यातील सत्तास्पर्धा असह्य पातळीवर पोहोचली तेव्हा सलग दुसऱयांदा जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजप आणि शिवसेनेचे नेते ज्या जनतेला गृहीत धरत आहेत त्या जनतेने मात्र अनेकदा पर्यायी मतदान केले आहे. याचा विसर पडला आणि भविष्यात कधीही अवेळी निवडणुका झाल्या तर पुन्हा भाजपचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल याची खात्री दोन्ही पक्षापैकी कोणाला असेल असे वाटत नाही.

शिवराज काटकर

Related posts: