|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पर्यायी सरकारसाठी आघाडीची खलबते

पर्यायी सरकारसाठी आघाडीची खलबते 

काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा

राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

काँग्रेस आघाडीचे ‘वेट ऍण्ड वॉच’

मुंबई / प्रतिनिधी

अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये समेट होण्याची शक्यता मावळल्यानंतर पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबते सुरू झाली आहेत. यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत राज्यात बिगर भाजप सरकारचा पर्याय देण्याबाबत चाचपणी करण्यात आली.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर तोंडसुख घेतले. फडणवीस यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या निर्धाराचा पुनरूच्चार केला. युतीतील या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर आघाडीने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी रात्री उशीरा ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. भाजपला वगळून राज्यात स्थिर सरकार देता येणे शक्य आहे काय? शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवता येईल काय? यावर चर्चा झाली. ही चर्चा करताना राज्यपालांच्या निर्णयापर्यंत थांबण्याचे दोन्ही काँग्रेसने ठरवले आहे.

राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीबाबत आज आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील स्थिती आणखी गडद झाली आहे. आता यातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. प्रक्रियेनुसार राज्यपालांनी विधानसभेतील सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले पाहिजे. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष आहे. युतीला जनादेश मिळूनही तो पाळायला तयार नाहीत. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पर्यायी सरकारच्या संदर्भात आमची कोणतीही रणनीती नाही. राज्यात बिगर भाजप सरकार यावे अशी आमची भावना असली तरी आमच्याकडे तेवढे संख्याबळ नाही, असेही थोरात म्हणाले.

भाजप सरकार बनविणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजीनामा देऊन भाजप सरकार बनवू शकणार नाही, अशी कबुली दिल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पाच वर्षातील नाकर्तेपणामुळे जनतेने फडणवीस सरकारला नाकारले आहे. विधानसभेत 220 जागा मिळविण्याचा त्यांचा दावा फोल ठरला. राज्यात भाजपचे सरकार येणार नसल्याने आम्ही आघाडीच्या मित्र पक्षांशी चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले. विद्यमान विधानसभेची मुदत उद्या, शनिवारी संपत आहे. विधानसभेची मुदत संपल्यानंतर फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तरी राहता येईल काय? याचा खुलासा झाला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: