|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना केवळ झेड प्लस सुरक्षा ठेवण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘गांधी कुटुंबातील दोन पंतप्रधानांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात ठोस कारवाई केली होती. त्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्यात आली आहे’, अशा शब्दात काँग्रेसने या निर्णयावर टीका केली आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ‘एसपीजी’सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतला होता. आता गांधी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आलेली सुरक्षाही हटविण्यात आल्याने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ‘एसपीजी’ सुरक्षेचे कवच असणार आहे. केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर गांधी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आलेली ‘एसपीजी’सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी एका वरीष्ठ अधिकाऱयाने दिली.

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हटले की, गांधी कुटुंबातील दोन माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवाद आणि हिंसाचारवर ठोस पाऊले उचलली होती. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षा हटविण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related posts: