|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अयोध्या खटल्याचा आज निकाल

अयोध्या खटल्याचा आज निकाल 

सरन्यायाधीशांकडून उत्तर प्रदेशातील सुरक्षेचा आढावासर्व यंत्रणा सतर्क असल्याची अधिकाऱयांची माहिती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या ऐतिहासिक आणि बहुचर्चित अयोध्या खटल्याचा निकाल शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाय सुनावणार आहे. सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखाली न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ होणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच या प्रकरणाची सुनावणी करणाऱया घटनापिठाचे सदस्य न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि अशोक भूषण यांची उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱयांनी सर्व यंत्रणा सतर्क असल्याची आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ातील परिस्थितीविषयी सरन्यायाधीश गोगोई यांनी माहिती घेतली. त्यावेळी मुख्य सचिव राजेंद्रकुमार तिवारी आणि पोलीस महासंचालक ओम प्रकाश सिंह यांनी त्यांना माहिती दिली. सोशल मीडियासह प्रत्येक संशयितावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत 450हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुमारे 10 हजारजणांवर ‘वॉच’ ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही अप्रिय घटना होणार नाहीत, याची हमीही या अधिकाऱयांनी सरन्यायाधीशांना दिली. केंद्र सरकारच्यावतीने केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी सीआरपीएफचे महासंचालक राजीव राय भटनागर, आयबीचे प्रमुख तसेच अंतर्गत सुरक्षा यंत्रणेशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेतली. सर्व राज्यांनाही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश दिल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 40 कंपन्या पाठवण्यात आल्या आहेत. केंद्रीय स्तरावरील सर्व गुप्तचर यंत्रणा आणि राज्यांमधील गुप्तचर यंत्रणा यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवून  वेगवान हालचाली करण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. सर्व समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली असून संवेदनशील बाबींवर कोणतीही अप्रिय भाष्य करु नये, असे विविध माध्यमांतून जनतेमध्ये प्रसारित करण्यात आल्या असून जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याविषयी आवाहन केल्याची माहितीही सरन्यायाधीशांना देण्यात आली आहे.

Related posts: