|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » सुमीत नागल, रामकुमारचा सहभाग निश्चित

सुमीत नागल, रामकुमारचा सहभाग निश्चित 

डेव्हिस चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सुमीत नागल व रामकुमार रामनाथन या एकेरीतील सर्वोत्तम भारतीय टेनिसपटूंनी पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी आपली उपलब्धता कळवली असून यानंतर भारतीय संघात त्यांचा समावेश केला गेला आहे. दि. 29-30 नोव्हेंबर रोजी तटस्थ ठिकाणी भारत-पाकिस्तान यांच्यात ही डेव्हिस लढत होणे अपेक्षित आहे.

या हंगामात सर्वोत्तम बहरात असलेल्या सुमीत नागलने गुरुवारी रात्री अखिल भारतीय टेनिस संघटनेला आपली उपलब्धता कळवली तर रामकुमार रामनाथनने काही दिवसांपूर्वीच आपण पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याचे जाहीर केले होते. ‘नवे बहिस्थ कर्णधार रोहित राजपाल यांनी संपर्क साधल्यानंतर सुमीतने ईमेलच्या माध्यमातून आपला सहभाग निश्चित केला’, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेने यावेळी स्पष्ट केले.

आता नागल व रामकुमार हे दोघेही उपलब्ध असल्याने भारतीय संघ एकेरीच्या आघाडीवर पाकिस्तानविरुद्ध जोरदार आव्हान उभे करु शकेल, असा होरा आहे. प्रज्ञेश गुणेश्वरन हा भारताचा सर्वोच्च मानांकित खेळाडू आपल्याच विवाह सोहळय़ामुळे या मालिकेत उपलब्ध असणार नाही. या फेरीतील पहिल्याच दिवशी त्याचा विवाह सोहळा संपन्न होत आहे.

दुहेरीत अनुभवी लियांडर पेसने आपली उपलब्धता कळवली असल्याने निम्मा संघ यापूर्वीच सज्ज आहे. अन्य खेळाडूंनी कोणते ना कोणते कारण दर्शवत माघार घेण्याचा सपाटा लावला असताना लियांडर पेसने मात्र कोणत्याही अटीशिवाय अगदी पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याचीही आपली तयारी असल्याचे जाहीर केले होते. चीनविरुद्ध बोपण्णासह दुहेरी डेव्हिस टाय खेळल्यानंतर लियांडरसाठी ही पहिलीच लढत असणार आहे.

46 वर्षीय लियांडर पेस डेव्हिस चषक लढतीतील सर्वात यशस्वी दुहेरी खेळाडू ठरला असून आता बोपण्णाशी संपर्क साधत त्याच्याशी उपलब्धतेबाबत चर्चा केली जाईल का, हे पहावे लागेल. अखिल भारतीय टेनिस फेडरेशनने बहिस्थ कर्णधार महेश भूपतीची हकालपट्टी केल्यानंतर या निर्णयावर बोपण्णाने जाहीर टीका केली होती. त्यामुळे, भारतीय टेनिस संघटना याबद्दल काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असणार आहे.

विद्यमान बहिस्थ कर्णधार रोहित राजपालने सर्वोत्तम संघ खेळवण्यावर आपला भर असेल, असे यापूर्वी म्हटले असून पेससमवेत खेळण्यासाठी जीवन व साकेत मायनेनी यांचे पर्याय उपलब्ध असतील, असा दाखला दिला होता. जीवन व साकेत या दोघांनीही पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस लढतीसाठी आपली उपलब्धता कळवली आहे. 

भारताला कर्तारपूर चालते, मग भारतीय टेनिसपटूंना का नाही?

पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही लढत पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार होती. पण, भारताने सुरक्षिततेचे कारण देत असमर्थता व्यक्त केल्याने ही लढत तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल, असा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने जाहीर केला. पाकिस्तानने त्यावेळी नाराजी व्यक्त केली. पण, आता कर्तारपूरमध्ये होणाऱया धार्मिक कार्यक्रमासाठी काही भारतीय भाविक पाकिस्तानात येऊ शकत असतील तर भारतीय टेनिसपटू पाकिस्तानात येऊन का खेळू शकत नाहीत, असा सवाल पाकिस्तान टेनिस फेडरेशनने उपस्थित केला आहे.

Related posts: