|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल

रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन शुक्रवारी आयपीएल प्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला. किंग्स इलेव्हन पंजाबने त्याचे दिल्लीशी ट्रेडिंग केले. अश्विनऐवजी आता डावखुरा गोलंदाज जगदीशा सुचिथ पंजाब संघात समाविष्ट होईल. दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाबला सुचिथ व अतिरिक्त दीड कोटी रुपये अशी ऑफर दिली होती. ती पंजाबने तात्काळ स्वीकारली आणि यावर शिक्कामोर्तब झाले. 33 वर्षीय अश्विनला यानंतरही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 2018 आयपीएल लिलावाप्रमाणे 7.6 कोटी रुपयांचे मानधन लाभणार आहे.

‘भारतीय क्रिकेट वर्तुळात आणि त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेतही रविचंद्रन अश्विन सर्वोत्तम आणि सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज राहिला आहे. त्याने भारतात व आयपीएल स्पर्धेत बऱयापैकी सातत्यपूर्ण योगदान साकारले आहे. अश्विनच्या समावेशाचा आमच्या संघाला निश्चितपणाने लाभ होईल, याबद्दल माझ्या मनात किंचीतही संदेह नाही. आयपीएलचे जेतेपद संपादन करणे, हे आमचे लक्ष्य आहे आणि त्या दृष्टीने अश्विनची उपलब्धता आमच्यासाठी हत्तीचे बळ देणारी ठरेल’, असे दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पार्थ जिंदाल येथे म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने देखील अश्विनच्या कराराचे स्वागत केले. ‘आमच्या प्रँचायझीचे घरचे मैदान संथ गोलंदाजीला पोषक आहे आणि तेथे फिरकी गोलंदाजीलाच अधिक मदत लाभत आली आहे. या पार्श्वभूमीवर, अश्विनसारखा चतुरस्त्र गोलंदाज महत्त्वपूर्ण ठसा उमटवू शकेल’, असे पाँटिंग येथे म्हणाला. अश्विनने भारतीय संघातर्फे 68 कसोटी व 111 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने अनुक्रमे 357 व 150 बळी घेतले आहेत.

33 वर्षीय अश्विन 2009 साली आयपीएल पदार्पण केल्यानंतर त्यात सातत्यपूर्ण योगदान देण्यात आघाडीवर राहिला. त्याने आजवर खेळलेल्या आयपीएलच्या 139 सामन्यात 125 बळी घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट 6.79 इतका राहिला. 2010 व 2011 साली आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया चेन्नई सुपरकिंग्स संघात अश्विनचा समावेश राहिला आहे. अर्थात, पंजाबचे नेतृत्व भूषवताना या संघाच्या खराब प्रदर्शनाची परंपरा अश्विन मोडीत काढू शकला नाही. आयपीएलमधील प्रारंभापासूनच खेळत असलेले पण, आजवर एकही आयपीएल जिंकू न शकलेले तीन संघ असून त्यात पंजाबचाही समावेश आहे.

अश्विन आता दिल्ली कॅपिटल्स संघात रुजू झाल्यानंतर पंजाबचे नेतृत्वपद रिक्त आहे. त्यात सलामीवीर केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल ट्रान्स्फर विंडो दि. 14 नोव्हेंबर रोजी बंद होत असून त्यापूर्वी आणखी काही ट्रेड होण्याची शक्यता आहे.

Related posts: