|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » टी-20 मालिका ऑस्ट्रेलियाकडे

टी-20 मालिका ऑस्ट्रेलियाकडे 

तिसऱया सामन्यात पाकिस्तानवर 10 गडी मात, वॉर्नर-फिंचची फटकेबाजी

वृत्तसंस्था/ पर्थ

ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात पाकिस्तानवर 10 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह यजमान ऑसी संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 फरकाने जिंकली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला होता. पाकने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 106 धावा केल्या. यानंतर, ऑसी संघाने विजयी लक्ष्य 11.5 षटकांत पूर्ण करत दणदणीत विजयाची नोंद केली.

प्रथम फलंदाजी करणाऱया पाकच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पाकच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इफ्तिकार अहमदने सर्वाधिक 37 चेंडूत 6 चौकारासह 45 धावा फटकावल्या. इमाम उल हकने 14 धावांचे योगदान दिले. ही जोडी वगळता इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. अहमदच्या शानदार खेळीमुळे पाकला शंभर धावांचा टप्पा गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने 18 धावांत 3 बळी घेत पाकच्या फलंदाजीला भगदाड पाडले. मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

पाकने विजयासाठी दिलेले 107 धावांचे किरकोळ लक्ष्य यजमान ऑसी संघाने 11.5 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरने 35 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह नाबाद 48 धावा केल्या. फिंचने अर्धशतकी खेळी साकारताना 36 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह नाबाद 52 धावांचे योगदान दिले. या जोडीने 109 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या मालिकेत शानदार कामगिरी करणाऱया स्टीव्ह स्मिथला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दीर्घकाळानंतर पुनरागमन करत 14 धावांत 2 विकेट घेणाऱया सीन ऍबॉटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आता, उभय संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला दि. 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 106 (इमाम उल हक 14, इफ्तिकार अहमद 45, केन रिचर्डसन 3/45, मिचेल स्टार्क 2/29, शॉन ऍबॉट 2/14).

ऑस्ट्रेलिया 11.5 षटकांत बिनबाद 109 (डेव्हिड वॉर्नर 35 चेंडूत नाबाद 48, ऍरॉन फिंच 36 चेंडूत नाबाद 52, आमीर 0/25, इमाद वासीम 0/12).

Related posts: