|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » क्रिडा » मालन, मॉर्गनचा न्यूझीलंडला तडाखा

मालन, मॉर्गनचा न्यूझीलंडला तडाखा 

चौथा टी-20 सामना : न्यूझीलंडवर 76 धावांनी मात

वृत्तसंस्था/ नेपियर

डेव्हिड मालन (51 चेंडूत 103) व कर्णधार इयॉन मॉर्गन (41 चेंडूत 91) यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 76 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. प्रारंभी, इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा चोपल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला 165 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता, उभय संघातील पाचवा व निर्णायक सामना रविवारी ऑकलंड येथे होईल.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला 8 धावांवर सँटेनरने बाद केले. यानंतर, टॉम बँटनला (20 चेंडूत 31) सँटेनरने पायचीत करत इंग्लिश संघाला दुसरा धक्का दिला. यानंतर, डेव्हिड मालन व कर्णधार मॉर्गन या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 182 धावांची भागीदारी करत किवीज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे, मालन आणि मॉर्गन यांनी तिसऱया गडय़ासाठी केलेली भागीदारी ही इंग्लंडसाठी सर्वोच्च ठरली. दरम्यान, डेव्हिड मालनने टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक साजरे करताना 51 चेंडूत 9 चौकार व 6 षटकारासह नाबाद 103 धावा फटकावल्या. त्याने आपले शतक अवघ्या 48 चेंडूत साजरे केले. दुसरीकडे, मॉर्गननेही तुफानी फटकेबाजी करताना 41 चेंडूत 7 चौकार व 7 षटकारासह 91 धावा चोपल्या. पण, शतकाच्या उंबरठय़ावर असताना त्याला साऊथीने बाद केले. मालन व मॉर्गनच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा फटकावल्या.

विजयासाठीच्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवीज संघाचा डाव 16.5 षटकांत 165 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 15 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 39 धावा केल्या. मार्टिन गुप्टील (27) व कॉलिन मुनरो (30) धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात विकेट फेकल्यामुळे किवीज संघाला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडकडून पॅरिक्सनने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 3 बाद 241 (टॉम बँटन 31, डेव्हिड मालन 51 चेंडूत नाबाद 103, इयॉन मॉर्गन 41 चेंडूत 91, सँटेनर 2/32, साऊथी 1/47).

न्यूझीलंड 16.5 षटकांत सर्वबाद 165 (गुप्टील 27, मुनरो 30, रॉस टेलर 14, टीम साऊथी 39, पॅरिक्सन 4/47, सॅम करन 1/36).  

मालनचे इंग्लंडतर्फे वेगवान शतक

या सामन्यात डेव्हिड मालनने शानदार शतक झळकावत इंग्लंडतर्फे वेगवान शतक नोंदवले. त्याने अवघ्या 48 चेंडूत शतकी खेळी साकारली. हा विक्रम नोंदवताना त्याने इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सचा विक्रम मोडला. हेल्सने लंकेविरुद्ध 60 चेंडूत शतक झळकावले होते. मालनने मात्र न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात 48 चेंडूत शतकी खेळी साकारत हा विक्रम मोडित काढला. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये शतकी खेळी साकारणारा तो हेल्सनंतर दुसरा खेळाडू आहे.

Related posts: