|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तंबाखूमुक्त करणार

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तंबाखूमुक्त करणार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा पहिल्या टप्यात तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प असून दुसऱया टप्यात माध्यमिक तसेच अन्य खाजगी शाळा तंबाखू मुक्त करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या 1980 शाळा पैकी आतापर्यंत 966 शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करण्याचा निर्धार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

   तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, डॉ. माने, महापालिका प्रशासन अधिकारी एस.के.यादव, राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या समुपदेशक चारुशिला कनसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, सलाम मुंबई फॉउडेंशनचे रवी कांबळे यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच सदस्य आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने निश्चित केलेल्या 11 निकषांची जिह्यातील सर्व शाळांनी  काटेकोरपणे करुन आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा बनवावी, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या निकषांमध्ये शाळांच्या परिसरात तंबाखूच्या वापरास प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धुम्रपान आणि तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे असे फलक लावणे, शाळांमध्ये तंबाखूचे दुषपरिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची पोस्टर्स लावणे, तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्यावर चिटकवणे, कोटपा कायद्याची प्रत शाळेत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच शासन नियुक्त नोडल अधिकारी  व आरोग्य अधिकारी यांच्या सल्लयाने कामकाज करणे, शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमामध्ये तंबाखू नियंत्रणचा समावेश करणे, शाळेपासून 100 यार्ड क्षेत्रात तंबाखू उत्पादनाच्या विक्रीवर पूर्ण बंदी असल्याचे फलक लावणे. तंबाखू नियंत्रण उपक्रमात काम करणाऱयांचा गौरव करणे आणि ‘आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा’ असा फलक लावावेत.

     तंबाखू नियंत्रण कायद्यातंर्गत जिल्हा परिषदेच्या 1980 शाळापैकी आतापर्यंत 966 शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील 69, भूदरगड तालुक्यातील 83, चंदगड तालुक्यातील 106, गडहिंग्लज तालुक्यातील  119, गगनबावडा 11,  हातकणंगले 145, कागल 69, करवीर 76, पन्हाळा 56, राधानगरी 30, शाहूवाडी 138 आणि शिरोळ 63 तंबाखूमुक्त शाळांचा समावेश आहे. उर्वरित सर्व शाळांनी तंबाखूमुक्त शाळेसंदर्भातील असलेल्या 11 निकषांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. याकामी गटशिक्षण अधिकाऱयांनी  पुढाकार घेऊन सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत तंबाखूमुक्त कराव्यात अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.

   शाळांच्या 100 यार्ड परिघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी

     शाळा, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये 100 यार्ड परिघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये बंदी असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले,  शाळांच्या परिसरात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 चे उल्लंघन केल्यास संबंधिता विरुध्द कडक कारवाई करावी. शिक्षण संस्था प्रमुख तसेच मुख्याध्यापकांनी तंबाखू नियंत्रण कायद्यांची कडक अंमलबजावणी करुन शैक्षणिक संस्था, शाळांचा परिसर तंबाखुमुक्त ठेवावा. शाळा तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखु नियंत्रणासाठी विशेष जनजागृतीपर फलक लावावेत. याकामी मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी सक्रीय योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

    अल्पवयीन व्यक्तीस तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, 18 वर्षाखालील व्यक्तीस तंबाखु व तंबाखू जन्य पदार्थ विक्री करणे हा गुन्हा असून कायद्यानुसार असे फलक सर्वच दुकानावर लावणे विक्रेत्यावर बंधनकारक आहे. तंबाखू जन्य पदार्थ खरेदी करणारे व्यक्ती 18 वर्षाखालील आहे किंवा नाही हे ओळखण्याची जबाबदारी तंबाखुजन्य पदार्थ विक्रेत्यांची आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.  तंबाखु नियंत्रण कायद्याची जिह्यात प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच गावागावत जनजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा.  ‘कोटपा’ कायद्याच्या जागृतीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर सर्व संबंधितांच्या विशेषत:  शिक्षकांच्या विशेष कार्यशाळा घेवून या कायद्याची माहिती द्यावी, याकामी गटशिक्षणांधिकाऱयांनी पुढाकार घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    प्रारंभी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले. समुपदेशक चारुशिला कनसे यांनी तंबाखू नियंत्रण कायाद्यातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी आभार मानले. 

 

Related posts: