|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ड्रेनेज ठेकेदाराला बेकायदा आठ कोटींची खिरापत

ड्रेनेज ठेकेदाराला बेकायदा आठ कोटींची खिरापत 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली आणि मिरजेच्या ड्रेनेज योजनेची वाट लावणाऱया ठेकेदार कंपनीला वाढीव दराने बेकायदा 8 कोटी रुपयांची खिरापत वाटली असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

स्थायी समिती आणि महासभेने वाढीव दराने बिले देऊ नये असा ठराव केला असतानाही दीड कोटीची बिले देताना त्यात 52 लाख रुपयांची दरवाढ दिल्याचे  त्यांनी सांगितले. या ड्रेनेज योजनेच्या घोटाळा आणि त्याच्या नुकसानीची वसुली करण्यासाठी आपण लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाआघाडीच्या काळात 118 कोटी रुपयांची ड्रेनेज योजना मंजूर केली होती. मिरजेत 54 टक्के, तर सांगलीत 49 टक्के जादा दराने कामे  दिली. या ठेकेदाराला आधीच दरवाढ दिली होती. दरवाढ देत 2013 ते 2016 या कालावधीत पाच कोटी 93 लाख रुपयांची दरवाढीची उधळण केली. गेल्या 4 वर्षांत 50 टक्केही कामे न झाल्याबद्दल 2016 मध्ये ठेकेदाराला दरवाढ देऊ नये असा ठराव केला. शिवाय त्याला सांगलीच्या कामात 25 हजार प्रतिदिन, मिरजेसाठी 15 हजार प्रतिदिन दंड केला. म्हणजेच दरवाढीचा विषय तेव्हाच संपला होता. तसे ठेकेदाराने महापालिकेला लेखी हमीपत्रही दिले. तरीही कारभारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाने उधळण सुरूच ठेवली.

दरवाढ न देण्याच्या ठरावा नंतरही तत्कालिन आयुक्तांनी 4 मार्च 2017 मध्ये 95 लाख बंगल्यावर बसून दरवाढीचे बक्षीस दिले. आताच्या आयुक्तांनीही अशाच पद्धतीने आता 52 लाख रुपयांचे दरवाढीचे बिल दिले आहे. कामे बंद असतानाही बिलांची ही बेकायदा उधळण कशासाठी ? एवढे करूनही त्याच्याकडून दंड वसूल केले नाहीत. याबद्दल आयुक्त कापडनीस यांना निवेदन दिले असून, ठेकेदाराकडून दंड वसूल करावा अशी मागणी केली आहे. जर दंड वसूल केला नाही, ठेकेदाराला काळ्या यादीत काढून मोकळे सोडले तर याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्तांसह प्रशासनावर राहील असा इशारा त्यांनी दिला. या योजनेचे वाटोळे झाले आहे. त्याला जबाबदार सर्व स्थायी समिती सदस्यांसह संबंधित अधिकारी, प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे. त्याची चौकशी होऊन संबंधितांच्या मालमत्तांवर टाच आणून त्याची वसुली करण्यासाठी लढा उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: