|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिवाजी स्टेडियमवर जादूटोण्याचा प्रकार

शिवाजी स्टेडियमवर जादूटोण्याचा प्रकार 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

खेळापेक्षा अन्य गोष्टीमुळे अधिक चर्चेत असलेल्या रत्नागिरेतील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आता जादू टोण्याचा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. स्टेडीयममधील धावपट्टीवर नारळ, लिंबू, अंगारा, हळकुंड आदी साहित्य आढळून आल्याने भल्या सकाळी सराव व व्यायामासठी आलेल्या रत्नागिरीकरांना धक्का बसला.

जंगलात किंवा निर्जन ठिकाणी जादूटोण्याचे प्रयत्न यापुर्वी उघडकीस आले आहे. मात्र आता भर शहरात जिथे क्रिडापटू घडतात त्या रत्नगिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्येच असा प्रकार घडल्याने क्रिडा वर्तुळातून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. स्टेडियमध्ये शुक्रवारी सकाळी नित्याप्रमाणे क्रिडापटूंची वर्दळ सुरू झाली. यावेळी मैदानावर जागोजागी फेकलेली लिंबे व धावपट्टीवर ठेवलेले जादूटोण्याचे सामान पाहून सर्वानाच धक्का बसला.

स्टेडियमधील मुख्य क्रिकेट धावपट्टीवर मध्यभागी नारळ, लिंबू, हळद-पिंजर, हिरव्या बांगडय़ा, लाल अंगाऱयाच्या प्लास्टीकच्या पुडय़ा, सुपाऱया, बदाम, खारका, हळकुंड असे साहित्य ठेवण्यात आले होते. नारळावर हळद-कुंकू, अंगारा वाहिलेला होता. मुख्य धावपट्टीच्या आजूबाजूला अनेक लिंबे जागोजागी टाकण्यात आली होती. पूर्वेकडील क्रिकेट सराव खेळपट्टीवरही अशाच प्रकारचे साहित्य आढळून आले.

गुरूवारी मध्यरात्री अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहरातील गजबजलेल्या भागात जादूटोण्यासारखा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. हा प्रकार कोणी व का केला असावा याबाबत उलट-सुलट मते व्यक्त होत आहेत. सोशल मिडीयावरून हा प्रकार सर्वत्र पसरल्याने विज्ञान युगात घडणाऱया अशा प्रकाराबाबत तीव्र पडसाद उमटत आहेत.

Related posts: