|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कार्तिक एकादशीला लोटला भक्तांचा जनसागर

कार्तिक एकादशीला लोटला भक्तांचा जनसागर 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

येथील प्रती पंढरपूर असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. अतिशय भक्तीमय वातावरणात पहाटे श्री विठ्ठल रखुमाईची पूजा झाली. याचवेळी एकादशीचे औचित्य साधुन दरवर्षी यात्रा भरली जाते यात्रेला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यंदा पहिल्यांदाच यात्रेला सकाळी 9 वा.पासूनच नागरिकांनी खरेदीला सुरूवात केली.

कार्तिकी एकादशी हा वारकरी सांप्रदायासाठी आनंदाचा सोहळा घेऊन येणारा सण मानला जातो. या सणाचे वैशिष्ट म्हणजे चार महिन्यांआधी देवशयनी एकादशीच्या मुहूर्तावर देव निजतात आणि कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पुन्हा जागे होतात असे म्हटले जाते, म्हणूनच कार्तिकी एकादशीला देव उठनी एकादशी असेही म्हटले जाते. या उत्सवानिमित्त रत्नागिरीतील प्रती पंढरपूरमध्येही मोठा सोहळा रंगतो. भजन, कीर्तनाने दिवसभर भक्तीमय वातावरणात हा उत्सव येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा करण्यात आला.

तर दुसरीकडे या एकादशीच्या यात्रेत चांगलाच जनसागर लोटला होता. नेहमी येथील बाजारपेठेत या यात्रेसाठी रात्रीच्यावेळी नागरिकांची गर्दी होते. यंदा मात्र सकाळी 9 वा.पासून नागरिकांनी स्वस्त वस्तूंच्या खरेदीसाठी हजेरी लावली होती. नागरिक इतक्या लवकर खरेदीला येतील याची कल्पना व्यापाऱयांनाही नव्हती त्यामुळे शुक्रवारी व्यापाऱयांना श्री.विठ्ठल रखुमाईचे आशिर्वाद चांगलेच भरभराटीला आले.

Related posts: