|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » …तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार

…तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डय़ांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून ‘टोल विरोधी सातारी जनता’ या सामाजिक समूहाने ‘आधी रस्त्यांची दुरुस्ती मग टोल वसुली’ ही घेतलेली भूमिका योग्य आहे. टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी येत्या 10 दिवसांत सातारा-पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक, प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, अन्यथा अकराव्या दिवशी टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा गर्भित इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 

   यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डय़ांमुळे चाळण झालेली असते. मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो तर, अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असून जीवित व वित्तहानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेत आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा-पुणे महामार्गावर सातत्याने खड्डे पडत आहेत. जनतेमधून संतापाची लाट उभी राहिली की तेवढय़ा पुरती मलमपट्टी होते. पुन्हा पहिले पाडे पंचावन्न, असे चित्र आहे. 

    आता मात्र हद्द झाली आहे. कुंभकर्णी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांना वठणीवर आणणे आवश्यक बनले आहे. ‘टोल विरोधी सातारी जनता’ या सामाजिक समूहाने योग्य भूमिका घेतली असून आधी सुविधा द्या मगच टोल वसुली करा, हे रास्तच आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांनी सातारा हद्दीतील महामार्गाची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत, अन्यथा अकराव्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.।़ 

Related posts: