|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांचा राजीनामा

मडगाव नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांचा राजीनामा 

प्रतिनिधी/ मडगाव

डॉ. जॅक सिकेरा हे जनमत कौलामुळे गोव्याचे हीरो ठरले. त्यांचा पुतळा उभारण्याच्या ठरावावर आम्ही ठाम आहोत. हा पुतळा उभारला जाणार हे निश्चित असून या मुद्यावर कुठलीच तडजोड केली जाणार नाही. त्यासाठीच आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शुक्रवारी सकाळी भाजप व काँग्रेसप्रणित नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार केल्याचा दावा केला होता. सदर दावा प्रभुदेसाई यांनी खोडून काढला. गुरुवारची खास बैठक कचरा समस्या व लोकहितार्थ विषय यावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आली होती. जॅक सिकेरा यांचा पुतळा उभारणे तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, उल्हास बुयांव, शणै गोंयबाब अशा विख्यात व्यक्तिमत्त्वांची नावे देण्यासंदर्भात चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. त्यांना कोणी विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता, असे प्रभुदेसाई म्हणाल्या.

काँग्रेस नगरसेवकांनीही केल्या होत्या सूचना

उलट काँग्रेसप्रणित नगरसेवकांनी सी पी दा कॉस्ता, कुन्हा व अन्य काही नावे रस्त्यांना देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या याकडे नगराध्यक्षांनी लक्ष वेधले. आता कोणत्या आधारे हे नगरसेवक कार्यक्रम पत्रिकेवर विषय नव्हता असा दावा करतात असा सवाल त्यांनी आपल्या कक्षात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला. यावेळी गोवा फॉरवर्डप्रणित अन्य नगरसेवक उपस्थित होते.

पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड नाही

डॉ. जॅक सिकेरा यांचा पुतळा उभारण्याचा ठराव नगरसेवक ग्लेन आंद्राद यांनी मांडला असता त्यास गोवा फॉरवर्डसह बहुतेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आम्ही डॉ. सिकेरा यांचा पुतळा फातोर्डात उभारणारच. आमचा पक्ष प्रादेशिक असून गोव्याची अस्मिता व अन्य बाबी राखण्यासाठी आम्ही पदांचा त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रभुदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षाच्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करण्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने आपण पुतळा उभा राहावा यासाठी मागेपुढे न पाहता पदत्याग केल्याचे त्यांनी सांगितले.

कचरा समस्येमुळे राजीनामा लांबणीवर

आपण फॅक्सने राजीनामापत्र पालिका संचालकांना पाठविले असल्याची माहिती त्यांनी दिली. 2 ऑक्टोबर रोजी राजीनामा देणार असल्याचे सांगून ते नंतर लांबणीवर का टाकण्यात आले असे विचारले असता, त्यावेळी कचरा समस्या उग्र बनल्याने न्यायालयात प्रकरण पोहोचले होते, याकडे प्रभुदेसाई यांनी लक्ष वेधले. त्यामुळे राजीनामा लांबणीवर पडला, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

बैठक घेऊन पुढील कृती ठरविणार

गोवा फॉरवर्डकडे 11 नगरसेवक आहेत. त्यामुळे आता सत्ता भाजप-काँग्रेस गटांकडे जाईल काय असे विचारले असता गोवा फॉरवर्डचा गट बैठक घेऊन पुढील कृती ठरविणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या भाजप व काँग्रेसप्रणित गटांचे 14 जण एकत्र असल्याचे सांगितले जात असले, तरी सत्ता मिळवेपर्यंत ते एकत्र राहतील काय हा प्रश्नच आहे. त्यातील दोन-तीन नगरसेवक आधीच गोवा फॉरवर्डच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. भाजप व काँग्रेस गटांतील या नगरसेवकांना नगराध्यक्ष बदललेला हवा होता असे सांगण्यात येत आहे. यासंबंधीचा उलगड?ा नवीन नगराध्यक्ष निवडीच्या वेळीच होणार आहे.

Related posts: