|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आपले जमीन व्यवहार पूर्ण स्वच्छ, स्पष्ट अन् कायदेशीर

आपले जमीन व्यवहार पूर्ण स्वच्छ, स्पष्ट अन् कायदेशीर 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले सर्व व्यवहार हे पारदर्शक आहेत, आणि त्यामध्ये कोणताही घोटाळा नाही, जे काही व्यवहार केलेले आहेत, ते आपण माझ्या खात्यातून पैसे देऊन केलेले आहेत. तसेच ही जमीन केवळ 21 हजार चौ. मीटर असल्याचे नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांवर मोठय़ा प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचे केलेले आरोप हे काहीशां गंभीर स्वरुपाचे असले तरीही मुख्यमंत्री सावंत यांनी सायंकाळी दै. तरुण भारतशी बोलताना याप्रकरणात कोणताही घोटाळा नाही, किंवा मोठे घबाड नाही, आपण जमीन खरेदीचे व्यवहार हे लपून छपून वा अन्य कोणाच्या नावावर खरेदीतून केलेले नाहीत, तर ते थेट स्वतःच्याच नावावरती आहेत, यावरून आपले व्यवहार स्वच्छ आणि स्पष्ट आहेत आणि तेवढेच ते कायदेशीर आहेत, असे जाहीर केले.

सर्व व्यवहार स्वच्छ, स्पष्ट, कायदेशीर

केवळ राजकीय असुयेपोटी आणि वैफल्यग्रस्त होऊन राजकीय नेत्यांनी हे आरोप केलेले आहेत, मात्र आपणही योग्य वेळी योग्य ते उत्तर देणार आहे, असे त्यांनी विजय सरदेसाई यांचे नाव न घेता जाहीर केले. आपण जी दोडामार्ग येथे जमीन घेतली ती दोन वा तीन लाख चौरस मीटर नसून केवळ 21 हजार चौ. मी. आहे. या जमिनीची किंमत रु. 46 लाख एवढी आहे. ही जमीन महाराष्ट्रातील व्यक्तीकडून न खरेदी करता ती गोमंतकीय व्यक्तीकडूनच खरेदी केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व व्यवहार हे लपून छपून नव्हे तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच केलेले आहेत.

आपले व्यवहार ताळेबंदात येणारच

आपण जमीन खरेदी विक्री व्यवसायात अनेक वर्षांपासून आहे. व्यवसाय हा कोणीही करावा, त्यात चुकीचे असे काहीही नाही. मात्र विनाकारण या गोष्टीला काही वैफल्यग्रस्त राजकीय व्यक्तींनी त्यांची पदे गेल्याने केवळ राजकीय सूड उगविण्याच्या उद्देशानेच वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र हा निव्वळ धंदा आहे. जो आपला पूर्वीपासून चाललेल्या व्यवसायाचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. घोटाळा तसेच भ्रष्टाचाराचा आरोप साफ फेटाळून लावला. आपण जे व्यवहार केलेले आहेत त्याचा उल्लेख आपल्या वार्षिक ताळेबंदात येणारच आहे, असेही ते पुढे म्हणाले.

 

Related posts: