|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु 

ईव्हीएमची माहिती देण्यासाठी घेतली बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव

जिह्यामधील तीन मतदार संघातील पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ईव्हीएम यंत्रांचा वापर केला जाणार आहे. या यंत्रांची माहिती तसेच आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींची आणि अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली. यावेळी अत्याधुनिक ईव्हीएम मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

जिह्यातील अथणी, कागवाड आणि गोकाक या मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. 5 डिसेंबर 2019 रोजी ही निवडणूक होणार आहे. 11 नोव्हेंबर 2019 पासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्या दिवशीपासूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 18 नोव्हेंबर 2019 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा  दिवस असणार आहे. 19 नोव्हेंबर अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबर 2019 रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. मतमोजणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

या निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. सध्या अत्याधुनिक असे ईव्हीएम यंत्र उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षक एन. व्ही. शिरगांवकर यांनी सांगितले. मतदान बॅलेट युनिटची मागीलवेळेपेक्षा यावेळी अत्यंत काळजी घेण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. यामध्ये कोणताही गैरप्रकार करता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या मतदान यंत्राचा वापर करण्यात येत आहे. मत कोणाला टाकले हे व्हीव्हीपॅटमध्ये स्पष्ट दिसते. त्यामुळे संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले.

अथणी मतदार संघासाठी 260 मतदान केंदे आहेत. कागवाड मतदार संघासाठी 231 आणि गोकाक मदतार संघासाठी 288 मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 779 मतदान केंदे तयार करण्यात आली आहेत. बॅलेट युनिक 1169, व्ही.व्ही.पॅट 1091 तर सीयु युनिट 974 आहेत. याचबरोबर अजूनही राखीव यंत्र सामुग्री या निवडणुकीसाठी सज्ज करण्यात आल्याची माहिती  देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी एकुण 8 हजार 500 हून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. निवडणूक झाल्यानंतर उमेदवारांनी सर्व खर्च वेळेत देणे बंधनकारक आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते काढुन त्यामधूनच निवडणुकीचा खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत ऐकर विभागाचे नुडल अधिकारी चौशेट्टी यांनी माहिती दिली. या बैठकीला राष्ट्रीय पक्षाचे विविध प्रतिनिधी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related posts: