|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उसावर झोनबंदी लादल्यास व्यापक लढा

उसावर झोनबंदी लादल्यास व्यापक लढा 

माजी आमदार मोहन शहा यांचा इशारा

वार्ताहर/   शिरगुप्पी

सीमाभागातील साखर कारखान्यांनी लगतच्या महाराष्ट्र राज्याच्या साखर कारखान्यांप्रमाणे उसाला वाजवी दर आदा करावा. तसेच मागील उसाच्या एफआरपीनुसार थकीत उसाची बिले शेतकऱयांच्या खात्यावर त्वरित जमा केल्यास शासनाला उसावरील झोन बंदी आणण्याची गरज भासणार नाही. मात्र ऊस उत्पादकांच्या या रास्त मागणीला डावलून यंदाच्या उसाला कमी भाव जाहीर केला आहे. शासनामार्फत उसावर झोनबंद लादल्यास ऊस उत्पादक वर्ग संघटित होऊन साखर सम्राटांच्या विरोधात व्यापक लढा उभा करतील, असा इशारा ऊसदर संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी आमदार मोहन शहा यांनी दिला.

शिरगुप्पी (ता. कागवाड) येथील ग्रामदैवत माँ साहेब दर्ग्याच्या पटांगणावर आयोजित ऊस उत्पादकांच्या सभेत शेतकऱयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी सेंदत्तीचे इरगोंडा पाटील होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडेण्णवर यांची  प्रमुख उपस्थिती होती. सुरेश चौगुले यांनी स्वागत केले.

राजेंद्र गडेण्णवर म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादकांनी आपल्या हक्काच्या ऊस बिलासाठी आजतागायत छेडलेले आंदोलन मवाळवादी असल्याने साखर सम्राट व शासनाच्या आडमुठय़ा धोरणाला शेतकरी बळी पडत आला आहे. आता मात्र ऊस उत्पादक कायद्याच्या चौकटीत राहूनच जहालवादी प्रमाणे लढा दिल्यास शासनच या साखर कारखान्यांकडून शेतकऱयांना त्यांच्या घामाचा दाम आदा करण्यासाठी भाग पाडेल, असे त्यांनी सांगितले.

23 च्या ऊस परिषदेत उपस्थित रहावे

शिरोळ तालुका स्वाभिमानीचे अध्यक्ष आदिनाथ हेमगेरे म्हणाले, शेतकऱयांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 23 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे 18 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सीमाभागातील हजारो ऊस उत्पादकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सभेत संघटनेचे अध्यक्ष आदिनाथ हेमगेरे, फुलारे मामा, ग्रा. पं. अध्यक्ष इकबाल कनवाडे, ऍड. अभयकुमार अकिवाटे, राजेंद्र पोतदार, रवि घाणगेर, विजयकुमार अकिवाटे, शशिकांत जोशी, रामगोंडा पाटील, सुरेश चौगुले, भिमा अकिवाटे, निपाणीचे प्रा. एन. आय. खोत, नंदकिशोर पाटील यांच्यासह अथणी, कागवाड, रायबाग, कुडची, चिकोडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. प्रकाश हेमगेरे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Related posts: