|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मंडोळी, हंगरगे गावांवर शोककळा

मंडोळी, हंगरगे गावांवर शोककळा 

टेम्पो-टॅक्टरची समोरासमोर धडक, पाच वारकरी जागीच ठार, मृतांमध्ये मंडोळी, हंगरगे येथीर वारकऱयांचा समावेश

वार्ताहर/ किणये

कार्तिक वारीनिमित्त मंडोळी-हंगरगे येथे वारकरी पंढरपूरला जात असताना टेम्पो व ट्रक्टरची समोरासमोर धडक होऊन पाच वारकरी जागीच ठार झाले. यामध्ये मंडोळीतील चार व हंगरगे येथील एका भाविकाचा समावेश आहे. सदर घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान सांगोला येथील मांजरी गावाजवळ घडली. यामुळे हंगरगा-मंडोळी गावांवर शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण (बाळू) परशराम आंबेवाडीकर (वय 48), महादेव मल्लाप्पा कणबरकर (वय 46), कृष्णा वामन कणबरकर (वय 46), अरुण दत्ता मुतगेकर (वय 36) सर्वजण राहणार मंडोळी व यल्लाप्पा (अदा) देवाप्पा पाटील (वय 39) रा. हंगरगा अशी अपघातात मृत झालेल्या भाविकांची नावे आहेत. या अपघातात अजूनही सहा भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कार्तिक एकादशीच्या दिवशीच हा अपघात झाल्यामुळे मंडोळी व हंगरगा गावातील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. या घटनेमुळे तालुक्मयातील वारकरी मंडळीतूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर दोन्ही गावातील नागरिकांनी आपले रोजचे व्यवहार बंद ठेवले. शेतकरीवर्ग शिवाराकडे गेला नाही. सर्वजण गावात बसून अपघाताच्या घटनेबाबत चर्चा करताना दिसत होते.

अनेक गावांमध्ये कार्तिक एकादशी साधेपणाने

सावळय़ा विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर क्रूर काळाने घाला घातल्याने तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये कार्तिक एकादशी साधेपणाने साजरी करण्यात आली. ‘उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पांडुरंगा’ अशा भजनात हंगरगा व मंडोळी गावातील वारकरी विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये काकड आरती करण्यात मग्न होते. याचवेळी पंढरपूरला गेलेल्या वारकरी भाविकांचा अपघात झाल्याचे वृत्त त्यांच्या कानावर पडताच साऱयांचेच डोळे पाणावले होते. लवकरच काकड आरतीचा समारोप करण्यात आला.

मंडोळी गावातून गुरुवार दि. 7 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान हे भाविक टेम्पोतून पंढरपूरकडे रवाना झाले होते. विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पूजाअर्चा करून टाळमृंदगाचा गजर ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करत ही वारकरी मंडळी पंढरपूरला रवाना झाले. विठ्ठलाच्या भेटीची आस त्यांना लागून राहिली होती. मात्र, यातील काही भक्तांची विठ्ठल भेट अधुरीच राहिली.

पहाटेच्या दरम्यान घटनास्थळावरून गावात दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दोन्ही गावातील पंचमंडळी सकाळीच सांगोलाकडे रवाना झाले. पंचक्रोशीतील नागरिकही हंगरगा-मंडोळी गावाकडे धाव घेऊन विचारपूस करताना दिसत होते. दोन्ही गावात सुमारे 500 ते 550 वारकरी आहेत. आषाढी कार्तिकी व माघवारीला भाविक मोठय़ा संख्येने पंढरपूरला जातात. ऐन कार्तिक एकादशीच्या दिवशीच अपघाताची घटना घडल्यामुळे सारे जण दुःखात बुडाले होते.

मंडोळी येथील लक्ष्मण (बाळू) आंबेवाडीकर हे गावात टेलरिंगचा व्यवसाय करीत. सर्वांशी ते मनमोकळेपणाने बोलायचे. अपघातात त्यांचे निधन झाल्यामुळे गावात टेलर बाळू गेला, असे भावूक होऊन नागरिक बोलत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

अरुण मुतगेकर हे फर्निचरचा व्यवसाय करीत असत. यात ते तरबेज होते.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

महादेव कणबरकर हे शेती करीत असत. शिवारात काबाडकष्ट करून संसाराचा उदरनिर्वाह करीत असत. घरचा आधारच सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. 

प्रामाणिक, निर्व्यसनी स्वभावाचा यल्लाप्पा (अदा)

हंगरगा येथील यल्लाप्पा (अदा) पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून टेम्पो व्यवसाय करतात. ही व्यक्ती मेहनती, प्रामाणिक स्वभावाची होती. सुरुवातीला त्यांच्याकडे छोटी गाडी होती. त्यानंतर त्यांनी बुलेरो टेम्पो घेतली. गावातील भाजीपाला व इतर मिळतील ती भाडी करत आपला उदरनिर्वाह ते करत असत. ते निर्व्यसनी होते. दरवषी आषाढी व कार्तिक वारीला नित्यनेमाने जायचे. त्यांच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

कृष्णा कणबरकर हे शेती करीत. शिवारात विविध प्रकारची पिके घेण्यासाठी ते नेहमी धडपड करीत असत. गावच्या सार्वजनिक कार्यात अग्रेसर असायचे. ते गावातील कृषीपत्तीन सोसायटीचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, चार भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

नूतन वास्तूची वास्तूशांती व मुलाचा नामकरण सोहळा रहिला अधुराच…

मंडोळी येथील कृष्णा यांनी गावात नूतन वास्तूची उभारणी केली आहे. पुढील महिन्यात त्या वास्तूचा वास्तूशांती समारंभ त्यांनी नियोजित केला होता. त्याचबरोबर  त्यांना पुत्ररत्न झाला होता. त्याचा नामकरण सोहळाही येत्या दोन महिन्यात करण्याचे ठरविले होते. पण काळाने घाला घातल्याने त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.

त्याच परिसरात एक दिवसाच्या अंतराने पुन्हा अपघात

गुरुवारी पहाटेच भुत्तेवाडी (ता. खानापूर) येथील वारकऱयांच्या टेम्पोला सांगोल्याजवळ जुनून गावाजवळ अपघात झाला होता. त्यामध्ये चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. त्यामध्ये काहीजण जखमी झाले होते. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटे पुन्हा बेळगाव जिल्हय़ातीलच मंडोळी व हंगरगा वारकऱयांच्या टेम्पोला अपघात झाला. त्यामध्ये पाच जणांना जीव गमवावा लागल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts: