|Thursday, November 14, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » राधे कृष्ण च्या जयघोषात श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा थाटात

राधे कृष्ण च्या जयघोषात श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा थाटात 

पुणे  / प्रतिनिधी : 

शुभमंगल सावधान… चे मंगलाष्टकांचे सूर… वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या पारंपरिक वेशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती व तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशीविवाह सोहळा पार पडला. राधे कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोषाने मंडईतील साखरे महाराज मठाचा परिसर दुमदुमून गेला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुलसी चरणी नतमस्तक होत, आपल्या मनोकामना त्यांच्याकडे मांडत होती. 
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यंदा ३७ वे वर्ष होते. 
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. 
दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करीत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगडया घालत फेर धरुन महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. 
रांगोळीच्या पायघडयांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठया संख्येने हजेरी लावली.

Related posts: