|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सायब,यंदा तरी मोटारीला लाईट देणार काय ?

सायब,यंदा तरी मोटारीला लाईट देणार काय ? 

कृष्णात चौगले : कोल्हापूर

सायब, गेल्या चार वर्षापास्न एमएसईबीच्या आफीसच उंबरठं झिजवल्यात. पण आजून आमच्या मोटारीला लाईट मिळाल्याली नाही. आम्ही कायं करायच ? तुम्ही लाईट देणार म्हणून आमी नदीपास्न शेतापातुर पाईप लाईन टाकलीया. पण लाईट काय मिळायला तयार नाही. सायब, यंदा तरी माझ्या मोटारीला लाईट देणार काय ? असा कळकळीचा प्रश्न शेतकऱयांकडून महावितरणचे अधिकारी आणि वीज कर्मचाऱयांसमोर उपस्थित केला जात आहे. जिह्यात 5 हजार 442 शेतकरी कृषीपंप वीज जोडणीच्या प्रतिक्षेत असून महावितरणने तात्काळ वीज जोडणी द्यावी अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.

महावितरणने उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषीपंपांना वीज जोडणी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार 2013-14 पासून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या देण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. त्यासाठी कोल्हापूर परिमंडलांतर्गत (कोल्हापूर, सांगली जिल्हा) 301 कोटी रूपयांच्या 85 निविदा काढल्या असून 45 कंपन्यांना कामही दिले आहे. पण विविध तांत्रिक अडचणींमुळे या कंपन्यांकडून अत्यंत कासवगतीने काम सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर जिह्यात 5 हजार 442 तर सांगलीमध्ये 10 हजार 175 शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या कामाची गती वाढवून शेतकऱयांना न्याय देण्याची गरज आहे.

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिह्यात आलेल्या महापूरामुळे महावितरणची संपूर्ण वीज यंत्रणा कोलमडली. रोहीत्रे, वीज खांब, विद्युत वाहक तारांसह अनेक उपकेंद्र पाण्याखाली होती. त्यामुळे ही यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱयांनी आतोनात कष्ठ घेतले. अद्याप काही काम बाकी असून ते युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे किमान पूरग्रस्त भागातील वीज यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर तरी कृषीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या द्याव्यात अशी शेतकऱयांतून मागणी होत आहे. एचव्हीडीएस प्रणाली अंतर्गत नदी अथवा विहीरीपर्यंत शेतकऱयांना उच्चदाबाची (11 के.व्ही) वाहिनी उभारून वीज जोडणी दिली जाणार आहे. 7.5 अश्वशक्ती जोडभारासाठी 10 केव्हीएचे, 10 अश्वशक्तीसाठी 16 तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास 25 केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जात आहे. यासाठी कोल्हापूरसाठी 18 आणि सांगलीमध्ये 27 कंपन्यांना कामे देण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी जिह्यात काही कामे पूर्ण झाली आहेत. पण पावसाळ्याच्या कालावधीत गेली पाच महिने हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात तरी वीज जोडणी द्यावी अशी शेतकऱयांची मागणी आहे.

कोल्हापूर जिह्यात 5 हजार 442 कृषीपंपांची वीज जोडणी प्रलंबित

विभाग प्रलंबित वीज जोडणी (प्रकरणे)

गडहिंग्लज 1124

इचलकरंजी 106

जयसिंगपूर 839

ग्रामीण 1 1806

ग्रामीण 2 1558

कोल्हापूर शहर 09

एकूण 5442

———————————————-

सांगली जिह्यात 15 हजार 617 कृषीपंपांची वीज जोडणी प्रलंबित

विभाग प्रलंबित वीज जोडणी (प्रकरणे)

इस्लामपूर 618

कवठेमहांकाळ 4374

सांगली ग्रामीण 2247

सांगली शहर 22

विटा 2914

एकूण 15617

Related posts: