|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » ग्रीन होमचा पर्याय स्विकारणेच हिताचे

ग्रीन होमचा पर्याय स्विकारणेच हिताचे 

वाढत्या तापमान वाढीचा फटका आपण सध्याला उपभोगतो आहोत. अतिवृष्टी, वादळे, अचानक तापमानात होणारी वाढ या साऱया ग्लोबल वॉर्मिंगच्या खुणा दर्शवत आहेत. या गोष्टींमुळे मनुष्यहानी तर होतेच आहे पण शेतीचेही अपरिमीत नुकसान होते आहे. तरीही आपण त्याकडे कानाडोळा करतो आहोत. आपण ज्या घरात राहतो तेच मुळी पर्यावरणाला पुरक पद्धतीने बांधलेले आहे का हे तपासण्याची वेळ आलेली आहे. नसेल तर भविष्यात पर्यावरणाला हातभार कसा लावायचा यासंबंधीचे पर्याय अवलंबायची गरज असणार आहे. आजच्या बिल्डरांनीही ग्रीन होम्ससारख्या पर्यायांवर गांभिर्याने विचार करायला हवा. ग्राहक किंवा खरेदीदारांनाही ग्रीन होम्सची संकल्पना समजावून सांगण्याची, त्याविषयी उपयुक्त कार्यशाळा घेण्याची गरज आहे. अशा प्रकारे जर शहरोशहरी जागृती केली गेली तर अनेकांचा पर्यावरणपुरक घरांच्या प्रकल्पांना निश्चितच होकार मिळेल. व्यापक पद्धतीने जागृती तिही विविध माध्यमांचा सहारा घेऊन करणे सर्वात महत्त्वाचे असते.

या घरांसाठी तसा थोडा जास्त खर्च येतो, त्यामुळे सामान्य वर्गाला यात रस असत नाही. उच्च वर्गातील ग्राहक ग्रीन होम्ससाठी तयार असतात. कारण त्यांना येणारा खर्च परवडणारा असतो हा एक भाग पण दुसरीकडे त्यांना चांगल्या भविष्याचीही चिंता असते. अर्थात ग्रीन होम्ससंबंधीच्या धोरणांबाबत अजुनही म्हणावी तशी जागृती समाजात होताना दिसत नाही. तसेच असे प्रकल्प उभारणाऱया चांगल्या बिल्डरांची संख्याही तोकडी आहे. याचाच अर्थ बिल्डरांनी ही संकल्पना राबवण्याची गरज अधोरेखीत होते आहे. बिल्डरांनीही ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. दिर्घकालीन भविष्यासाठी आपले आयुष्य वाढवण्यासाठी ग्रीन होम्सची संकल्पना स्वीकारावी लागणार आहे. सामान्यांना याबाबत जागृती, चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं तर निश्चितच त्यांचाही याप्रती विचार सकारात्मक होईल.

प्रकल्पाचा खर्च

अनेकजण ग्रीन होम्स प्रकल्पातील घरांच्या किमती या अवाढव्य असतील अशीच कल्पना करतात. ग्रीन होम्समुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो. या प्रकारच्या घरांमुळे ऊर्जा वापर 20 ते 30 टक्के कमी होतो, पाण्याचा वापरही 30 ते 50 टक्क्यांनी कमी होतो. याखेरीज वाया जाणाऱया घटकांचे प्रमाणही खूप अंशी कमी होतं. ग्रीन होम्समुळे आपल्याला उत्तम शुद्ध हवा मिळते तसेच दिवसाचा उत्तम उजेड मिळतो, जेणेकरून विजेचा वापर आपल्याला कमी करता येतो. अशा प्रकल्पांचा खर्च हा इतर इमारतींच्या बांधकाम खर्चाच्या 15 टक्केहून अधिक येतो. पर्यावरणपुरक कोणत्या गोष्टी समाविष्ट करणार आहोत त्यावर वाढणारा खर्च ठरत असतो.

 पूर्वीच्या घरांचा विचार करता त्याकाळी लाल कौलारू छत, मातीच्या भिंती यामुळे घर उन्हाळय़ात थंड आणि हिवाळय़ात उबदार राहायचं. आता तसं करणं सुरक्षिततेला धरून नाही. म्हणून मग काँक्रीटच्या घरांचा पर्याय पुढे आला. पण आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घराला पर्यावरणपुरक करतो आहोत. आधुनिक यंत्रणांच्या साथीने वीजेच्या वापरावर नियंत्रण मिळवू लागलो आहोत. आतील तापमानावर नियंत्रण मिळवू लागलो आहोत शिवाय वाया जाणारे पाणी वाचवण्याचे पर्याय अवलंबत आहोत. बांधकाम साहित्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आता बिल्डर्सही पुढचे पाऊल टाकत आहेत. यायोगे वाढणारं कार्बनचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. एकंदर पाहता ग्रीन होम्सची संकल्पना जास्तीत जास्त रूजवली जायला हवी आणि आणि तिच खरी गरज आज अधोरेखीत होत आहे. 

Related posts: