|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » स्मार्ट मॉडर्न किचन

स्मार्ट मॉडर्न किचन 

स्वयंपाकघर अर्थात आजच्या परिभाषेत किचन. किचन हेच नाव आज सर्वदूर अधिक दृढ झालंय. ही गृहिणींची खोली आज अनेक अंगाने मॉडर्न होताना दिसते आहे. दिसायला आधुनिकता आलीच पण आता आधुनिक उपकरणांची पडणारी भर किचनचं रूप आणखी खुलवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे किचनला ग्लॅमर मिळतंय आणि किचन दिवसेंदिवस अधिक स्मार्ट बनतंय.

आजची घरं ही किचनला मध्यवर्ती ठेवत बनवली जात आहेत. म्हणजेच बिल्डर किंवा आर्किटेक्टला घराची जबाबदारी दिल्यावर सर्वात आधी किचन स्मार्ट बनवण्याचे प्रयोजन करावे लागते. यावरून आजच्या युगात किचन किती महत्त्वाचं आहे हे समजून येऊ शकतं. आज ही खोली फक्त स्वयंपाक करण्याची राहिली नाही. इथे आपण फुरसतीचे क्षण घालवू शकतो, तसेच कामही करू शकतो आणि मनोरंजनाचाही आनंद घेऊ शकतो. स्वयंपाक करण्याची जागा तर ही आहेच पण त्याजोडीला खोली बहुपर्यायी असेल हे सर्वाथाने पाहिलं जात आहे. जागेचा सही उपयोग करून तंत्रज्ञानयुक्त उपकरणांसह स्मार्ट डिझाइनचं किचन करण्याची गरज आज व्यक्त होत आहे आणि हाच मुख्य दृष्टीकोन ठेवत आजचे इंटिरीअर डिझाइनर्स किचनची रचना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सगळं  करताना किचनमध्ये वावरण्यातली सहजता कुठेही हरवणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

 इलेक्ट्रॉनिक गॅजेटस्ची रचना करताना अडगळ होणार नाही हे पाहिलं जातं. बिल्ट-इन-किचन्सची संकल्पना अधिक लोकप्रियता मिळवू पाहते आहे. किचन अप्लायन्सेस दिसायला सुंदर असावीत आणि ती वापरातही आपली उपयुक्तता सिद्ध करणारी असावीत. स्मार्ट तंत्रज्ञानानेयुक्त उपकरणे आज बाजारात दाखल होत आहेत. यांचा विचार आधुनिक किचन बनवलेल्यांनी जरूर करायला हवा. कुठलंही नवीन उपकरण घरी आणण्याआधी त्यातील फिचर्स वा वैशिष्ठय़े पाहायला विसरू नका.

आपल्या किचनमध्ये त्या उपकरणाला पुरेशी जागा असल्याची खात्री करा. नवे उपकरण हे कमी ऊर्जा वापरणारं असायला हवं. स्टार रेटेड उपकरणं निवडायला हरकत नाही. इकोप्रेंडली गॅजेटस् खरेदी करण्याला प्राधान्य द्यायला हवे. यांच्या किमती जास्त असल्या तरी ही उपकरणे दीर्घकाळ टिकतात, हे लक्षात ठेवा. वापरात वेगवान, सुटसुटीत आणि कार्यक्षमता उत्तम असणारे उपकरण निवडण्यासाठी प्रयत्न करा. फ्रीज असो की ओव्हन, ते घेताना वैयक्तिक शैली पूर्ण  करणारं तर असावंच पण आधुनिकतेत बसणारंही हवं. शिवाय आपल्या स्वयंपाकघराच्या अंतर्गत मांडणीला ते शोभेल, हेही पाहावं लागेल. आजच्या जमान्यासाठी उपयुक्त आणि भविष्यातही चालणारी वैशिष्ठय़े असणारी उपकरणे खरेदी करण्याची खबरदारी घ्यावी लागते. 

आंतरराष्ट्रीय बाजारावर भारतीय बऱयापैकी लक्ष ठेऊन आहेत. किचनच्याबाबतीतही असंच घडतं आहे. नव्या अप्लायन्सेस आणि गॅजेटस्मध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेंडस् अधिक सखोलपणे डोकावू लागले आहेत. यातलाच एक अविष्कार म्हणजे, ओटय़ावर असणाऱया कॅबिनेटमधील शेल्फ हे ऑटोमेटीक वर-खाली होणारे आले आहे. ज्यांचा हात पोहचत नाही अशांना या शेल्फचा खूप उपयोग होत आहे. याखेरीज आज छोटय़ा किचनसाठी इलेक्ट्रॉनिक सॉकेटस्सह ड्रॉव्हर्स आले आहेत. तसेच ग्लास पॅनेल आणि ग्लास चॉपिंग बोर्डस् हेही आज किचनमध्ये आपलं स्थान पक्क करू लागले आहेत. वॉर्मर ड्रॉव्हरचा प्रकारही आज बाजारात आलाय. ज्यात शिजवलेलं अन्न आणि प्लेटस् गरम राहण्याची सोय असते. चिमणी, ओव्हन, फ्रीज, डिशवॉशर्स यांचा वापरही आधुनिकतेला अनुसरून होताना दिसतोय.

 ड्राय किचन

 नव्या युगात एक नवी संकल्पना रूळायला लागली आहे. ती आहे ड्राय किचनची. ही एकतर लिव्हिंगरूम किंवा बेडरूममध्ये रचली जाते. ड्राय किचनमध्ये  स्वयंपाकाची आवश्यक ती कोरडी (पाण्याचा वापर न होणारी) तयारी केली जाते. सँडविच बनवणे, फळे कापणे आणि बेडटोस्ट तयार करणे अशी कामे येथे केली जातात. 4 दरवाजांचा फ्रीज, कॉफी मशिन, वॉर्मर ड्रॉव्हर, हॉब, एअरफ्रायर अशा गोष्टी येथे ठेवण्याचा पर्याय असतो. त्वरीत नाष्टा करायचा असेल तर किचनमध्ये जाण्याची गरज उरत नाही. आपण वरीलपैकी एका उपकरणाच्या साहाय्याने झटपट खाद्यपदार्थ करून घेऊ शकतो.

Related posts: