|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पुन्हा अयोध्येला जाणार

पुन्हा अयोध्येला जाणार 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद घेणार

एक अध्याय संपून नवे पर्व सुरू झाले

मुंबई / प्रतिनिधी

रामजन्मभूमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने एक अध्याय संपून नवे पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शनिवारी केली. आता पूर्वीचा इतिहास उगाळत न बसता नवीन इतिहास जोडू या, असे आवाहनही त्यांनी केले.

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले. आजच्या निकालाने अनेकांच्या डोळय़ासमोरून संपूर्ण कालखंड गेला असेल. निकालानंतर केवळ देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंना बाळासाहेबांची आठवण येणे स्वाभाविक आहे. कारण बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा अंगार फुलवत आवाज बुलंद केला. गर्वसे कहो हम हिंदू है, अशी घोषणा त्यांनी दिली होती, असे ठाकरे म्हणाले.

रामजन्मभूमीसाठी आंदोलन उभे करणारे विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे घेण्याचे टाळले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून या विषयाला महत्त्व दिले. आता निकाल आल्यानंतर मी अडवाणींना भेटून त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ज्यावेळी शिवसेनेने हा विषय ऐरणीवर आणला तेव्हा बऱयाच हिंदूत्ववादी संघटना शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत होत्या, याची आठवण त्यांनी करून दिली.

आजच्या निकालाने स्वत:ला समाधान आहे. कारण गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी शरयू नदीच्या तिरावर जाऊन आम्ही आरती केली होती. त्यावेळी शिवजन्मभूमीची माती चमत्कार घडवेल या विश्वासाने शिवनेरीची मूठभारी माती मी अयोध्येला नेली होती. ही माती ठेवल्यानंतर आज वर्ष पूर्ण व्हायच्या आत अयोध्येचा निकाल आला. आता मी पुन्हा शिवनेरीला जाऊन तिथल्या मातीला वंदन करणार आहे आणि कदाचित येत्या 24 तारखेला परत अयोध्येला जाईन, असेही त्यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना आता काशी, मथुरेबाबत तोंडी हिंदुत्व मानणाऱयांनी नव्हे तर खऱया हिंदुत्ववाद्यांनी लढा दिले पाहिजे, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.

हिंदूंनी निकालानंतर जरूर आनंद व्यक्त करावा. परंतु, कुणाच्या भावना दुखावतली असे वेडेवाकडे काही करू नये. देशातील सर्व धर्मीयांनी आज  समजूतदारपणा दाखवला. असाच समजूतदारपणा नेहमी दाखवला तर आपला देश जगातील सर्वात मोठी शक्ती बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रामजन्मभूमी आंदोलनात बलिदान देणाऱया कारसेवकांचे ठाकरे यांनी यावेळी स्मरण केले.

Related posts: