|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मंदिर, मशिदीसमोर कडक बंदोबस्त

मंदिर, मशिदीसमोर कडक बंदोबस्त 

प्रतिनिधी/ सांगली

अयोध्या येथील रामजन्मभूमी निकालानंतर सांगली शहरासह जिह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मंदिरे, मशिद व दर्ग्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील ठिकाणे, चौकाचौकात मोठय़ा प्रमाणत पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पाहरा देत आहेत. पोलिसांच्याकडून सोशल मीडियावरही कडक ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास कडक कारवाईचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिला आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील रामजन्मभूमी संदर्भातील याचिकेवर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तब्बल 106 वर्षे जुना असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपूर्ण देशात सुरक्षेच्या दृष्टीने ‘हायअलर्ट’ जारी करण्यात आला होता. दरम्यान जिल्हह्यातही या निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा पोलीस दलाने घेतली होती. गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात शांतता समितीच्या बैठका घेतल्या होत्या. निकाल काहीही येवो शांतता राखण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  डॉ. सुहास वारके यांनी पोलीस मुख्यालयात बैठका घेत पोलीस अधिकाऱयांना सक्त सूचना केल्या होत्या.

मंदिर, मशिदींना बंदोबस्त

शनिवारी सकाळी 11 वाजता अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्रीपासूनच जिह्यातील सर्व मंदिरे, मशीद आणि दर्ग्यासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांगली शहरातील  गणपतीमंदिर, केशवनाथ मंदीर, मारुती मंदिर, पंचमुखी मारुती पोलीस, विठ्ठल मंदिर, स्वामी समर्थ मंदिरासह सर्व प्रमुख मंदिरे, सर्व मशिदी आणि दर्ग्यासमोर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय बदाम, गुलमोहर चौक या संवेदनशील †िठकाणी पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पाहरा देत होते. संपूर्ण दिवसभर जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक आपआपल्या कार्यक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी भेटी देत सुरक्षेचा आढावा घेतला.

सोशल मीडिया ‘खामोश’

निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर होती. निकालासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अगर वादग्रस्त विधान केल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. व्हाटस् ऍप गुपच्या ऍडमिनना अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शनिवारी दिवसभर सोशल मिडीया ‘खामोश’ राहीला. कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर आली नाही. सर्वांनी एकतेचा संदेश देत या निकालाचे स्वागतच केले. काही व्हॉटस् ऍप ग्रुपच्या ऍडमिननी तर गुपच काही काळ ‘इनऍक्टीव्ह’ केला होता. त्यामुळे पोलिसांना चांगलाच दिलासा मिळाला.

पोलिसांचे योग्य नियोजन

अयोध्यातील निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी पोलिसांच्याकडून घेण्यात आली होती. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी आठ दिवसांपूर्वीच पोलीस अधिकाऱयांच्या बैठका घेत सक्त सूचना दिल्या होत्या. याशिवाय दोन दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता.

 

Related posts: