|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्तास्थापनेचा दावा

अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्तास्थापनेचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप-शिवसेनेतील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी येत्या दोन दिवसात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे.

13 व्या विधानसभेची मुदत संपूनही राज्यात सत्तास्थापन होत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.

बिचुकले यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘मी स्वतः गेली 20 वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणास माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन 2004, 2009, 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2019 साठी मी 182 वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरू, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वतः चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहीत असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा.

येत्या दोन दिवसांत मा. राज्यपाल, महाराष्ट्र यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे’ असे बिचुकले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Related posts: