|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तणावातून मुक्तीसाठी चित्रपटांची गरज – डॉ. सोनावणे

तणावातून मुक्तीसाठी चित्रपटांची गरज – डॉ. सोनावणे 

सांगली / प्रतिनिधी

सांगली फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गिरीश कर्नाड फिल्म फेस्टिवलला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. तणावातून मुक्तीसाठी आणि नवी दिशा मिळण्यासाठी चित्रपट हे योग्य माध्यम असे मत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रताप सोनावणे यांनी यावेळी व्यक्त केले. उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कर्नाड यांचे तीन चित्रपट दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली.

प्रतिवर्षी फिल्म सोसायटीच्या वतीने चित्रपट सृष्टीतील एका नामांकित व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून फिल्म महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय चित्रपटकार, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून परिचित असलेल्या गिरीश कर्नाड यांच्या कार्यकाळातील उत्तम कलाकृती रसिकांना दाखविण्यात आल्या.

यावेळी बोलताना सोनावणे म्हणाले, सध्या समाजातील सर्वच स्तरातील लोक तणावाखाली असून त्यातून बाहेर येण्यासाठी आणि दिशा मिळण्यासाठी चांगल्या कलाकृतींची ओळख होणे चांगले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सोसायटीचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना गत तीन वर्षातील विविध महोत्सव आणि कार्यशाळा यांचा आढावा घेतला. प्रा. अमित ठक्कर यांनी कर्नाड यांच्या आठवणी सांगितल्या. दिवसभराच्या महोत्सवात कर्नाड यांची पटकथा असलेला संस्कार, अभिनय असलेला मंथन आणि दिग्दर्शन असलेला उत्सव असे तीन चित्रपट दाखविण्यात आले. स्वागत कार्यक्रम सचिव अभिजित पोरे यांनी प्रास्ताविक शिवराज काटकर यांनी केले. आभार सचिव यशवंतराव घोरपडे यांनी तर सूत्रसंचालन समीर जोशी यांनी केले.

Related posts: