|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » संमोहित करणारी कथाकथन सम्राज्ञी

संमोहित करणारी कथाकथन सम्राज्ञी 

प्रतिभासंपन्न बुद्धिमान लेखिका आणि एक समर्थ कथाकथनकार अशा दुहेरी भूमिका समर्थपणे पेलणाऱया गिरिजा कीर यांचे अलीकडेच निधन झाले. गिरिजा कीर यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. देशविदेशात त्यांचे कथाकथनाचे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले आणि गाजले. त्यांनी शंभरपेक्षा जास्त पुस्तके लिहिली. कुष्ठरोग्यांच्या आश्रमात, येरवडय़ाच्या तुरूंगात, कॉलेज आणि सरकारी शाळांमध्ये त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले. अशा या कथाकथन सम्राज्ञीस आदरांजली!

 ती तारीख मला आठवत नसली तरी तो दिवस मात्र मला अजूनही चांगलाच आठवतोय. 1972 साल होतं ते. गिरगावातल्या राममोहन शाळेत मी आठवीच्या वर्गात शिकत होतो. आमच्या राममोहन शाळेत त्यावेळी महिन्यातून एक दिवस एखाद्या नामवंत व्यक्तीला बोलावलं जायचं. कधी गाण्याचा कार्यक्रम व्हायचा किंवा कधी उद्बोधनाचा, कधी कुणी क्रीडाक्षेत्रातले नामवंत येऊन आपले अनुभव सांगायचे. तर कधी एखादा सिनेकलावंत येऊन चंदेरी दुनियेची छोटी सफर घडवून आणायचा.

त्या दिवशी अशीच एक व्यक्ती आमच्या शाळेनं बोलावली होती. कथाकथनाच्या क्षेत्रातली दिग्गज म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरिजा कीर त्या दिवशी आमच्या शाळेत येणार होत्या. गिरिजा कीरांच्या काही कथा त्यापूर्वीही मी वाचल्या होत्या. त्या वयातल्या मला त्यांच्या सगळय़ाच कथा फारशा कळल्या नसल्या तरीही आवडल्या होत्या. भाषा सोपी पण चटकदार होती. कथेतली पात्रं आपली वाटणारी होती. वाचताना प्रसंग ठसठशीतपणे जिवंत उभे रहात होते, अशा छान छान कथा लिहिणाऱया या लेखिकेला बघायला मी आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी उत्सुक होतो. मधल्या सुटीत डबा खाताना एकच विषय आम्हा विद्यार्थ्यांच्या तोंडी होता. ‘किती छान लिहितात नं त्या बाई.’ एकजण म्हणाला. ‘त्यांची ‘चोरावर मोर’ कथा तर कित्ती मस्त आहे.’ आणखी एकाची प्रतिक्रिया.

‘त्या बाई दिसायला पण खूप सुंदर आहेत म्हणे.’ वर्गातल्या एका मुलानं विशेष माहिती पुरवली.

‘तू कधी बघितलंस त्यांना?’ आमचा प्रश्न.

‘आमच्या वाडीत गणेशोत्सवात त्यांचा कार्यक्रम झाला होता. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एकदम मस्त. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांची सहीपण घेतलीये.’ त्या मुलाने आपली कॉलर ताठ केली. मी पण सही घेणार त्यांची. मी मनोमन ठरवलं. वर्गाचा मॉनिटर असल्यामुळे आलेल्या पाहुण्यांच्या जवळ जायची संधी मला सहज मिळू शकत होती.

मधली सुट्टी संपली आणि तासाची बेल झाली. दोन पिरियेड झाल्यानंतर शेवटचे दोन पिरियेड ऑफ देऊन त्या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सर्व विद्यार्थी दाटीवाटीनं हॉलमध्ये बसलो. गिरिजा कीर आल्या. बेताची उंची, गोरापान लखलखीत वर्ण, सतेज चेहरा आणि कपाळावर रुपयाच्या आकाराचं ठसठशीत कुंकू. पहाता क्षणीच कुणालाही आवडावं असं लोभस व्यक्तिमत्त्व. जोशी सरांनी त्यांची औपचारिक ओळख करून दिली आणि गिरिजा कीर बोलायला उभ्या राहिल्या. ओठांतून बोलायच्या आधी त्या डोळय़ांतून बोलल्या. मान किंचित वळवून त्यांनी सभागृहात बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नजर फिरवली. आणि सर्वांकडे पाहून ओळखीचं हसल्या. खरंच आजही ते हसू माझ्या डोळय़ांत तस्संच साठलेलं आहे. जणू आम्हा सर्वांची त्यांची पूर्वीपासून ओळख होती. त्या क्षणी त्या आम्हाला पाहुण्या वाटल्याच नाही. एखादी लाड करणारी मावशी किंवा आत्या भेटावी असं वाटलं.

त्या दिवशी त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ‘अगं मुली मागे बघ’. असंच काहीसं त्या गोष्टीचं नाव होतं. गरिबीमुळे हुंडा न देता लग्न झालेल्या तरुण मुलीला सासरी होणारा छळ होतो आणि तिला माहेरी धाडलं जात नाही. तिची आई मात्र मुलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. कालांतराने आई म्हातारी होते. भ्रमिष्ट होते. पण तरीही आपली मुलगी येईल हा आशेचा तंतू मात्र तिच्या मनात कायम असतो… अशीच काहीतरी ती कथा होती.

ती कथा सांगताना गिरिजा कीरांनी ती विवाहित मुलगी आणि तिची आई अगदी हुबेहूब रंगवली. त्याचबरोबर निवेदन करणारी लेखिका देखील.

गोष्टीतल्या त्या चाळीतलं वातावरण, तिथला चौक, पाठीमागची विहीर सगळं नेपथ्य त्यांनी शब्दांतून आमच्यासमोर उभं केलं. गोष्ट ऐकता ऐकता आम्ही सगळेजण गुंग झालो. मुलीची वाट बघणाऱया त्या भ्रमिष्ट म्हातारीची क्यथा ऐकून सगळय़ांचे डोळे पाणावले. अगदी खडूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणिताच्या सरांनी देखील रुमालाने डोळे पुसले होते.

गोष्ट संपली. आणि आम्ही सर्वजण भानावर आलो. टाळय़ा वाजल्या. पण मनातून मात्र ती गोष्ट जात नव्हती… कार्यक्रम संपला. आम्ही मुलांनी सहीसाठी वहय़ा घेऊन बाईंभोवती गराडा घातला. बाई हसत हसत एकेकाला सहय़ा देऊ लागल्या. सही घेण्याआधी मी खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्मयावरून हात फिरवला… मला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं.

एखाद्या नामवंत कथालेखिकेचा मला मिळालेला तो पहिला आशीर्वाद होता. त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की आपल्याला पण अशा गोष्टी सुचल्या पाहिजेत… लिहिता आल्या पाहिजेत…

मला पक्कं आठवतं की त्यादिवशी बाईंनी आमच्या शाळेने त्यांना दिलेलं मानधनाचं पाकीट परत केलं होतं आणि म्हणाल्या होत्या, ‘या पैशातून तुमच्या शाळेच्या वाचनालयासाठी चांगली चांगली पुस्तकं घ्या. मुलांना वाचनाची आवड लागली की मला मानधन मिळालं. मलाही शाळेत शिकणारे दोन मुलगे आहेत. हे सगळे विद्यार्थी मला माझ्या मुलांसारखेच आहेत. मी यांचीही आईच आहे. मला वेगळं मानधन नको.’

त्या दिवशी गिरिजा कीर या माझ्या मनात कायमच्या रुजल्या. पुढे मी त्यांचे कथाकथनाचे अनेक कार्यक्रम पाहिले. गिरगावच्या ब्राह्मणसभेच्या वार्षिकोत्सवात, आग्निपाडय़ाच्या बी.आय. टी. चाळीतील पटांगणात, लालबागच्या मैदानावर….अनेक ठिकाणी…. एसेस्सी होऊन मी चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला आणि मराठी वाङ्मय मंडळात मी गिरिजा कीरांच्या  कथाकथनाचा कार्यक्रम व्हावा असं सुचवलं. आमच्या सिनियर्सनी ती कल्पना उचलून धरली आणि आमच्या कॉलेजमध्ये त्यांना आमंत्रण दिलं.

पुढे मी स्वत: कथा लिहू लागलो. मध्ये बरीच वर्षं गेली आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. क्यक्तिगत ओळख वाढली आणि एके दिवशी गिरिजाबाईंनी मला फर्मावलं, ‘तू मला आई म्हणायचं. आणि अहो आई नाही, अगं आई….’ शंभराहून अधिक पुस्तकं प्रकाशित असलेल्या प्रतिथयश लेखिकेला ‘अग आई’ म्हणणं हा माझ्या दृष्टीने मिळोला बहुमूल्य पुरस्कारच होता. मी आईला भेटायला साहित्य सहवासात नियमित जाऊ लागलो. गप्पा मारू लागलो. गप्पांतून तिच्या स्वभावाचे आणि कार्यकर्तृत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. मराठीत कथाकथन करणाऱया स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देखील नाहीत. त्यातही ज्या आहेत त्या दुसऱया कुणाची तरी कथा सांगतात किंवा स्वत:ची कथा असेल तर ती वाचून दाखवतात. पण विलक्षण ताकदीनं स्वत:चीच स्वतंत्र कथाकथन करणारी मला वाटतं एकमेव लेखिका म्हणजे गिरिजा कीर. एकमेव…अद्वितीय….

स्वतंत्र कथाकथनाचे देशात आणि परदेशात आईचे आजवर दोन हजारच्या वर कार्यक्रम झाले आहेत. ती कथाकथन करते म्हणून त्यांना कथाकथन म्हणायचं. खरंतर तो एकपात्री नाटय़प्रयोगच असतो. नेपथ्य आणि वातावरण ती शब्दांतून श्रोत्यांच्या डोळय़ांसमोर हुबेहूब उभं करते. त्यातल्या पात्रांचे संवाद ती स्वत: म्हणत असताना ती त्या व्यक्तिरेखेत शिरते. पात्र न पात्र जिवंत करते. कथा सांगताना ती भावभावनांचे हिंदोळे झुलवते. नर्मविनोदानं हसवते. तर कधी कारुण्यानं रडवते. मुद्राभिनयानं खिळवून ठेवते आणि मध्येच एखादा विचार मांडून उपस्थितांना अंतर्मुख करते.

तिच्या तोंडून कथा ऐकताना आपण केवळ ऐकत नसतो तर प्रत्यक्ष ती कथा घडताना बघत असतो. तिच्या कथाकथनाचा हा एकपात्री कार्यक्रम पहाताना मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्मय. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. माझ्या सुदैवाने मी हा आनंद अनेकदा अनुभवला आहे. आईच्या कथाकथनाचे अनेक कार्यक्रम झाले. गाजले. त्यापैकी एक गाजलेला कार्यक्रम होता, दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणावर झालेला कार्यक्रम. साठावं किंवा एकसष्टावं अखिल भारतीय साहित्य संमेलन गंगाधर गाडगीळांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलं होतं. सहा कथाकार आपापल्या कथा कथन करणार होते. कथाकथनाच्या त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते सुप्रसिद्ध कथालेखक
द. मा. मिरासदार.

राजा शिवाजी विद्यालयाचं पटांगण श्रोत्यांनी तुडूंब भरलं होतं. एखाद्या नामवंत गवयाची मैफिल कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशीच वाटते अशा अवस्थेतले श्रोते दाटीवाटीनं बसले होते. मी ही एक मोक्मयाची जागा पकडून बसलो होतो. आईनं त्यावेळी ‘निदान दोन अश्रू’ ही कथा सांगितली. ती गंभीर कथा ऐकताना टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली होती. आम्ही सर्वजण मनाचे कान करून ऐकत होतो. कथा सांगून पूर्ण झाली आणि आई खाली बसली तरी श्रोते कथेच्या गुंगीतच होते. टाळय़ा वाजवायचं देखील कुणाला भान राहिलं नव्हतं. मग व्यासपीठावर बसलेल्या द. मा. मिरासदारांनी टाळय़ा वाजवल्या आणि आम्ही सर्वजण भानावर आलो. टाळय़ांच्या कडकडाटांनी केवळ पटांगणच नव्हे तर आजूबाजूचा परिसरही दुमदुमून गेला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या कार्यक्रमत एकूण सहाजणांनी आपापल्या कथा सांगितल्या. पण कार्यक्रम संपल्यानंतर परतणाऱया श्रोत्यांमध्ये चर्चा होती ती ‘निदान दोन अश्रू’ या कथेचीच.

आईच्या कथाकथनाचे कार्यक्रम भारतभर झाले. देश विदेशातही झाले. अगदी अमेरिकेत जाऊनही आईनं तिथल्या माणसांना मंत्रमुग्ध केलं आहे.

आईच्या  कथाकथनाचा पंधराशेवा जाहीर कार्यक्रम अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आला होता. एस पुरुषोत्तम नावाच्या कॉन्ट्रक्टरनी त्याचं आयोजन करून तशी जाहिरात केली होती. त्या कार्यक्रमाला जाणं मला शक्मय नव्हतं. म्हणून मी कार्यक्रम झाल्यानंतर आईला भेटलो त्यावेळी तिने सांगितलेली ही हकीकत…

तो आईच कथाकथनाचा पंधराशेवा कार्यक्रम होता अन् परदेशातला मात्र पहिलाच.

अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष नार्वेकर साहेब आणि त्यांच्या पत्नी दोघंही गिरिजा कीरांच्या कथांचे चाहते होते. त्यांनी  आईच्या अनेक कथा वाचल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र मंडळात गिरिजा कीर हे नाव सुचवलं आणि एकमतानं ते सर्वांना मान्य झालं. त्यानंतर आईच्या कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण द्यायला नार्वेकरसाहेब आणि त्यांच्या पत्नी स्वत: भारतात आल्या. आईच्या घरी जाऊन त्यांनी अमेरिकेत येण्याची विनंती केली.

अमेरिकेत जाऊन कथाकथनाचा कार्यक्रम करण्याचा मान पटकावणारी गिरीजा कीर ही पहिलीच लेखिका. आई अमेरिकेला गेली. कथाकथनाचा दिवस उजाडला पण तिच्या मनात मात्र सारखी धुकधुक सुरू होती. भारतात कथाकथन  करणं वेगळं आणि अमेरिकेतल्या श्रोत्यांसमोर कथा सांगणं वेगळं… तिथली संस्कृती भिन्न, तिथले प्रश्न. जरी ती माणसं मुळची भारतीय असली तरी एवढं वर्षं अमेरिकेत राहिल्यामुळे त्यांची अभिरूची भिन्न असण्याचीही शक्मयता होतीच. इथल्या स्त्राrच्या समस्या तिथे नाहीत. तिथल्या समस्या वेगळय़ा. तिथलं सामाजिक वातावरणही वेगळंच. त्यामुळे त्या श्रोत्यांना आपली कथा कितपत अपील होईल याबद्दल आईच्या मनात साशंकता होती. ‘इथं एखादं गणपतीचं देऊळ आहे का?’ आईनं कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी आलेल्या आयोजकांना विचारलं. ‘असेल तर मी आधी दर्शन घेते आणि नंतर आपण कार्यक्रमाला जाऊया.’ ‘अहो, आपला कार्यक्रम गणेश मंदिराच्यचा परिसरातच आयोजित केला आहे. खाली गणेश मंदिर आहे आणि वर आपल्या कार्यक्रमाचा हॉल आहे.’ आयोजक म्हणाले आणि आईचा चेहरा क्षणात उजळला. हॉलमध्ये कार्यक्रमाला  जाण्यापूर्वी ती मंदिरात गेली. गणरायाचं दर्शन घेतलं आणि डोळे मिटून हात जोडून म्हणाली,

‘आज माझीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राची मान उंचावण्याची जबाबदारी तुझी आहे यश दे….’ वक्रतुंड महाकाय श्लोक मनातल्या मनात घोळवतच आई सभागृहात शिरली. सभागृहातल्या सगळय़ा खुर्च्या श्रोत्यांनी भरल्या होत्या. ज्यांना बसायला खुर्ची मिळाली नव्हती असे काही श्रोते भिंतीच्या कडेकडेनं उभे होते. आईनं नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी सगळय़ांवर एक नजर फिरवली आणि कथाकथनाला आरंभ केला. पहिल्या दोन मिनिटांतच तिला जाणवलं की हा सगळा श्रोतृवर्ग आपला झालाय. समोरच्याच्या डोळय़ांत बघून मन वाचायची कला आईला अवगत होती. श्रोत्यांच्या डोळय़ांनीच आईला पसंतीची पावती दिली आणि आईचा हुरुप वाढला. त्या कार्यक्रमात आईनं दोन कथा सांगितल्या. एक हलकीफुलकी, नर्मविनोदी आणि दुसरी गंभीर…दोन्ही कथांची जातकुळी सर्वस्वी भिन्न तरीही नर्मविनोदी कथेला श्रोत्यांतून येणाऱया हास्यकारंजा इतकाच उत्कट प्रतिसाद गंभीर कथेला श्रोत्यांच्या डोळय़ांतील आश्रूंनी दिला होता.

आईचं कथाकथन नेहमीसारखंच फुललं. टाळय़ांनी सभागृह कडाडून गेलं. आईच्या कथाकथनानंतर मध्यंतर होता आणि त्यानंतर कार्यक्रम होणार होता तो चित्र प्रात्यक्षिताचा.

भारतातून विख्यात चित्रकार बापूसाहेब गांगल आणि त्यांच्या पत्नी सुधाताई गांगल अमेरिकेत गेल्या होत्या. चित्रकार बापूसाहेब गांगलांच्या पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक होणार होतं. एक मॉडेल समोर बसवून बापूसाहेब गांगल त्या मॉडेलचं पोर्ट्रेट बनवणार होते. बापूसाहेब कॅनव्हासजवळ गेले आणि पोर्ट्रेटला सुरुवात करण्यापूर्वी समोरच्या रसिक प्रेक्षकांना उद्देशून म्हणाले,

‘आज मी इथं चितारणारं पोर्ट्रेट जर चांगलं झालं नाही तर त्याचा सगळा दोष गिरिजाताईंचा असेल.’

‘अं…. माझा दोष…?’ आई बावचळली. तिचा श्वास क्षणभर अडकल्यासारखा झाला. पण तोच बापूसाहेब पुढे म्हणाले, ‘त्यांनी सांगितलेल्या कथेच्या वातावरणातून मी अद्याप बाहेर पडू शकलेलो नाहीये. त्यामुळे चित्रात माझं लक्ष आज कितपत लागेल हा प्रश्नच आहे.’ उपस्थित सगळय़ांच्या तोंडून सुस्कारा बाहेर पडला. आईच्या चेहऱयावरही हसू उमटलं. एका जगविख्यात कलाकाराकडून मिळालेली ती उत्स्फूर्त दाद होती. अमेरिकेत त्यानंतरही आईचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. गाजले.परदेशात स्थायिक झालेल्या उच्चविद्याविभूषित, सुखसंपन्न भारतीय श्रोत्यांसमोर आईनं कथाकथन केलं तसंच आईनं कु÷रोग्यांच्या आश्रमात जाऊनही कथाकथन केलं आहे. तिनं येरवडय़ाच्या तुरुंगातल्या जन्मठेपेच्या कैद्यांसमोरही कथा सांगून त्यांच्या मनावर सुसंस्कार केले आहेत. तिनं सरकारी शाळेत जाऊन तिथल्या गरीब विद्यार्थ्यांसमोरही कथा सांगितल्या आहेत. हे सगळे कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं होणारे दौरे करत असताना तिचं लेखनही तितक्मयाच जोमानं बहरत होतं. अनेक कथा कादंबऱया तिच्या लेखणीतून उतरल्या, अनेक व्यक्तिचित्रं तिनं शब्दांनी रंगवून जिवंत केली. एक प्रतिभासंपन्न बुद्धिमान लेखिका आणि एक समर्थ कथाकथनकार अशा दुहेरी भूमिका समर्थपणे पेलणाऱया आईला मनापासून दंडवत.

गुरुनाथ तेंडुलकर

मो. 9892009898

Related posts: