|Friday, February 28, 2020
You are here: Home » leadingnews » सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण 

ऑनलाईन टीम : मुंबई

भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून उद्या (दि. 11) संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. जनतेने युतीला कौल दिला असला तरी शिवसेनाभाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी माघार घेतली नाही. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असणार्‍या भाजपला सत्ता स्थापनेसाठी शनिवारी आमंत्रित केले. मात्र भाजपने रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेना बरोबर येत नसल्याने सत्ता स्थापन्यात असमर्थता दर्शवली. त्यानंतर आता राज्यपालांनी अपेक्षेनुसार दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.

दरम्यान, भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतरच शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. संजय राऊत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत.

Related posts: