|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘राजर्षी शाहूं’च्या नावाने सुरू करणार ‘होमिओपॅथिक संशोधन केंद्र’

‘राजर्षी शाहूं’च्या नावाने सुरू करणार ‘होमिओपॅथिक संशोधन केंद्र’ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ‘होमिओपॅथिक संशोधन केंद्र’ सुरू करणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी केले.  महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी (मुंबई-शिखर संस्था)तर्फे  हॉटेल सयाजी  येथे रविवार (दि. 10) रोजी पश्चिम महाराष्ट्र होमिओपॅथिक व्यावसायिकांसाठी एक दिवसीय ‘होमिओपॅथिक’ (एमसीएचकॉन) परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर होते.

यावेळी डॉ.दिलीप म्हैसेकर म्हणाले, 125 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये होमिओपॅथी औषधप्रणालीचा सार्वजनिक आरोग्य सेवेत समावेश केला. कोल्हापूरमधील संशोधन केंद्राचा पश्चिम महाराष्ट्रातील होमिओपॅथिक प्राध्यापक, डॉक्टर व विद्यार्थ्यांना  लाभ होणार असून संशोधन अधिक प्रमाणात होण्यास मदत होईल. इतर पॅथीप्रमाणे होमिओपॅथी औषधप्रणाली प्रभावी असून त्याचा प्रसार व प्रसार होणे गरजेचे आहे. तसेच सर्व होमिओपॅथर्सनी मॉडर्न फॉरमॅकोलॉजी (सीसीएमपी) कोर्स करण्याची गरज आहे. संशोधनासाठी प्राध्यापकांप्रमाणेच वैद्यकिय व्यावसायिक व विद्यार्थ्यांनाही आरोग्य विज्ञान विद्यापीठ अर्थसहाय्य करते त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यानंतर बोलताना शाहू महाराज छत्रपती म्हणाले, आपल्या देशात ग्रामीण भागाची व्याप्ती जास्त असल्याने इतर औषधप्रणालीचे डॉक्टर्स उपलब्ध नसतात. त्या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टर्सच आरोग्यसेवा पुरवितात. हे त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे.

या तज्ञांनी केले विविध विषयांवर मार्गदर्शन

दिवसभर चालणाऱया परिषद सकाळ व दुपार अशा दोन सत्रात झाली. सकाळचे सत्र : मुंबई येथील डॉ. एल. एम. ढवळे होमिओपॅथिक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आनंद कापसे यांनी ‘होमिओपॅथिक औषधाव्दारे मणक्याचे विकार व संधीवात यावरील आधुनिक उपचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर पुण्याचे प्रसिध्द होमिओपॅथिक तज्ञ डॉ. किर्तीसिंह चौहान यांनी ‘होमिओपॅथी व मानसिकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांनी होमिओपॅथर्सनी चिकित्सक पध्दतीने संशोधकवृत्ती जोपासासवी, असे सांगितले. दुपारचे सत्र :  ‘होमिओपॅथिक औषधांचे शरीरामध्ये होणारे सकारात्मक परिणाम’ याचे सविस्तर विवेचन एसजेपीईएस होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयातील फिजीओलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ. संतोष रानडे यांनी केले. यामध्येच ते दुष्परिणाम विरहीत होमिओपॅथी औषधाची मात्रा रूग्णास कशा प्रकारे लागू होते. याचे संशोधनात्मक पुरावे दिले. तसेच होमिओपॅथिक वैद्यकिय व्यवसाय करताना येणाऱया अडचणी, समस्या व विविध कायदेशीर बाबी यासंबंधी होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे (गडहिंग्लज) प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा व मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड. राजाराम बनसोडे  यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर याप्रसंगी केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरूण भस्मे, अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल यांची समायोचित भाषणे झाली. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.राजकुमार पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ.अजित फुंदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.सुनेत्रा शिराळे यांनी केले. 

 500 हून अधिक डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग

याप्रसंगी कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते मॉडर्न फॉरमॅकोलॉजी (सीसीएमपी) कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना अतिरिक्त शैक्षणिक अर्हता नोंदणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा औपचारिक शुभारंभ केला. या परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 500 हून अधिक होमिओपॅथिक व्यावसायिक डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित

पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर ज्यांनी होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून अविरतपणे रुग्णसेवा दिली. त्यांना भारतातील होमिओपॅथिचे गुरूदेव यांच्या स्मरणार्थ ‘डॉ. बी. के. बोस’ ऍवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. मोहन गुणे, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. संजीव मुजूमदार, डॉ. रविकुमार जाधव व डॉ. चारूता पाटील-शिंदे यांचा समावेश आहे.

Related posts: